आ
आ the second vowel and second letter in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच दुसर स्वर. .
आजेसासरा n mother-in-law's father or father-in-law's father. सासूचकी सासराचकी बाप. uis मझ एक आजेसासराच (म्हणजे, मझ सासराच बाप) नाव होत॑ क्रिष्णमूर्ति राव अणी अण्कीएक आजेसासराच (म्हणजे मझ सासूच बाप) नाव होत॑ शेषगिरि राव.
आजेसासू n mother-in-law's mother or father-in-law's mother. सासूचकी सासराचकी अम्मा. uis मझ एक आजेसासूच (म्हणजे, मझ सासूच मायाच) नाव होत॑ यमुना बायी अणी अण्कीएक आजेसासूच (म्हणजे, मझ सासराच मायाच) नाव होत॑ यशोदा बायी.
आकर्षण n attraction. इच्छा अथवा आग्रहामळे होयाच ओढ/होढ uis सिनिमाच वेड आकर्षण एवढे थोरळा झालांपिरी पणीं तला सोडल नाही.
आकर्षणशक्ती n gravitational force. attractive force. एकाला स्वताकडे ओढाच/होढाला होयाच शक्ती. uis चंद्र भूमीला प्रदक्षिणा कराला मुख्य कारण भूमीच आकर्षणशक्ती मळे आहे.
आकार n form, figure, shape. appearance. aspect. आकृती. रूप. uis जुने काळांत लंडनांतल॑ "टवर-ॲफ-लंडनांत" ते देशाच भरून प्रमुख लोकांच मृत्यु दंड झालाहे. अत्तापणीं रात्रीच वेळ तिकड कित्येकांच भूताच आकार दिसते म्हणून सांगतात.
आकाश n sky. आकाश. uis आकाशाच नील रंगाच कारण सूर्यकिरण वायुमंडलाला लागून तजमळे होत॑ म्हणून डा. सी.वी.रामन हेनी विवरण देलाहेत.
आकाशगंगा n Milky way galaxy. सूर्य अणी वेगळ कोटानुकोटी नक्षत्रसमूहाच नाव. uis (1) "मिल्की-वे" नक्षत्रसमूहाला "आकाशगंगा" म्हणून सांगणे आहे. (2) हिंदू पुराणाप्रकार भगीरथ राजा उग्र तपस करून आकाशांतून गंगादेवीला भूलोकांत उतरीवले. अमावस्या रात्री आकाशांत वृश्चिक राशीच बाजूंसून अम्हाला हे "आकाशगंगा" पाह्याला होईल.
आकाशवाणी n voice from the sky. आकाशांत्सून याच गोष्टांच शब्द. अशरीरी. uis देवकी अणी वसुदेवांच वराड होऊन त्यांस रथांत घेऊन जाताना "ह्यंच आठवां लोंक तुज मृत्यूला कारण होईल" अस एक आकाशवाणी ऐकून कंसाला भयंकर राग आल॑. तक्षणेच देवकीला वध कराला निश्चय करलातरीन, वसुदेवांच समाधानाच गोष्ट ऐकून ते वेळाला शांत झाला.
आकाशवाणी n name under which radio broadcast is done in India. भारताच रेडियो प्रक्षेपण संस्थाच नाव. uis पूरा देशांत पहिलपसून/पुढेधरींगून होतते "आळ इंडिय रेडियो" हे नाव बदलिवून "आकाशवाणी" अस करलेतरीन तमिल-नाडांते अत्तापणीं तिकडून होयाच रेडियो प्रक्षेपणाला "आळ इंडिय रेडियो" असेच सांगतात.
आकांक्षा n expectation. yearning. deep desire. गाढ/मुम्मर इच्छा. uis त्यंच-त्यंच लेंकरे चोखट/चोखोट स्थितींत असाम/असांव म्हणून अस्कि माय-बापालीं आकांक्षा असणे सहजच.
आकृती n shape. figure. आकार. रूप. uis कोटानुकोटी वर्षापुढे आफ़्रिका, आस्ट्रेलिया, भारत अणी अन्टार्टिका भूखण्डांच आकृती वेगळ होत॑. ते वेळ हे चारीन "गोन्ड्वानालॅन्ड" अस एक महाभूखंडाच भाग होत॑.
आक्रमण n invasion. attack. आक्रमण. uis मोहम्मद गज़नवी भारताच वर अठ्रादपा आक्रमण करला.
आगम n laid out procedure as per shastras or tradition. शास्त्र अथवा धर्म-संप्रदायाच विधान. uis विनायक चतुर्थीच नंतर दूसर दिवसकी, पांचवां दिवसकी विसर्जन कराला बसीवलते ठिकाणींत्सून बाजूला सरीकवलतर विसर्जन करलते आगम होत॑. नंतर दोन-तीन दिवस थांबून चोखोट पाणींत विघरीवून ते पाणी तुळसीच झाडाला घालूया. अस करणे घाणके "हुस्सेनसागर लेकांत" घालाबरीस उत्तम.
आग्रह n persistance to attain (a desire etc.). गाढ इच्छा. uis तला संगीत अणी कला असल॑ कार्यांत पूरा जीवन चालिवाम/चालिवांव अस फार आग्रह होत॑तरीन उद्योगाच अणी कुटुंबाच जवाबदारी हे सर्व निर्बंधामळे ते आग्रह पूरा कराला झाल नाही.
आचमन n ritual of sipping small quantity of water thrice as a part of performing pooja. पूजा करताना उद्धरणींतूं तीनदपा पाणी घोंटाला लागीवून गिळाच पद्धत. uis आचमन करताना केशवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा माधवाय स्वाहा, अस सांगणे आहे.
आचरण n observance. आचरण. अनुसरण करणे. uis धर्माच आचरण करणे एक मनुषाच मुख्य कर्तव्यांत एक आहे.
आचार n conduct as per shastras. शास्त्राप्रकार वागणे. uis चोखोट आचारांत वाढलते लेंकरे कद्दीं वंगळ वाटेंत जाईनात.
आचार n social behaviour. समूहांत वागाच रीत. uis भरूनदपा उंच वर्गांच लोकांच आचार ल्हान वर्गांच लोकांच विरुद्ध अस्ते. हेजमळे समुदायांत विध-विध प्रश्न होत अस्त॑. समुदायाच उद्धारण प्रयत्न करणारांमध्ये हे एक मुख्य तर्क/विवाद आहे.
आचार-विचार n social practices and usages. समुदायांत वागाच रीत. uis वेगळ-वेगळ धर्म अणी वर्गांत असणार॑ वेगळ-वेगळ आचार-विचाराजोक्त आचरण करतात.
आचारे n priest. पुरोहित. uis (1) अम्च गांवांच/गामाच देऊळांत देवपूजा कराला एक नव॑ आचारेला नियुक्त कराला देऊळ चालिवाच समिति निश्चय केलहोत॑ तरीन सर्काराच धर्म-विभागाच मंत्रि ते सम्मत केले नाही अस आजच पत्रांत॑ वाचलों. (2) अत्तच काळांत आचारे लोक महीनाल॑ वीस-पंचवीस हदार रुपे संपादतात॑. तेन्हालपणीं अम्ही "प्रोफषणलस" म्हणूया.
आचार्य n spiritual teacher. गुरू. uis "आचार्य", हे शब्दाच अर्थ "एक धर्म-गुरू" अस असलतरीन, समुदायाच बहुमानाला योग्य असाच व्यक्तींला पणीं "आचार्य" म्हणून सांगणे आहे.
आज adv today. हे दिवस. आजच दिवस. uis गेल तीन दिवसापसून दीपावली पटाकीच शब्द भरून होत॑, पण आज अग्गीन शांत झालाहे.
आज-उजा adv today or tomorrow. in a day or two. very shortly. आज-उद्या. आज नाहीतर उजा/उद्या. एकदोन दिवसांत. फार लोक्कुरच. uis एस.एस.एल.सी परीक्षाच परिणाम आज-उजा कळल अस मझ लोंक तज मित्राला फोणांत सांगत होत ते मी ऐकलों.
आज-उद्या adv today or tomorrow. in a day or two. very shortly. आज-उजा. आज नाहीतर उद्या/उजा. एकदोन दिवसांत. फार लोक्कुरच. uis लोकसभाच मतदान काल संपल॑ अणी आज-उद्या तज परिणाम कळल.
आजन्म adj life long. जन्मपूरा. आजीव. uis तज वय जवळ-जवळ चाळीस वर्ष होत आहे तरीन वराडाच गोष्ट तज तोंडांतून येतच नाही. आजन्म ब्रह्मचारी म्हणूनच राह्याच उद्धेश आहे वाटत॑.
आज गिळणे उद्या मिळना prov what one has today may not be there tomorrow. a bird in hand is worth two in the bush. आज हातांत्सून सुटलतर पुन्हा कद्दीन मिळना.
आजा n grandfather. बापाच बाप अथवा मायेच बाप. आजोबा. uis चंद्रगुप्त मौर्य साम्राट अशोकाच आजा होते.
आजानुबाहु adj a great person having the required physical sign of having hands reach up to his knees. a great man. फार मोठ॑ मनुष. ओठाकताना गुडिघा पतोरी हात लांब असाच मनुष. uis "आजानुबाहु" हे शब्दाच अर्थ "ओठाकताना गुडिघापतोरी हात लांब असाच मनुष" अस असल तरीन, हे अर्थाच आधार काय हे कळाला मी करलते प्रयत्न पूरा व्यर्थ झाल॑ !
आजी n grandmother. बापाच माय. मायेच माय. uis मझ अम्माच पटीसच आजी बासष्टवां वर्षांत मरले अणी मझ बापाच पटीसच आजी त्यंच अठ्रावां वर्षांत मरले.
आजीव adj lifelong. जन्मपूरा. आजन्म. uis हस्तिनापुरीच शंतनु महराजांच दुसर वराडाला बाधा येताने म्हणून आजीव ब्रह्मचारी होऊन असतों म्हणून देववृत राजकुमार भीष्मप्रतिज्ञा काढलत्यामळे त्यांस भीष्माचार्य म्हणून नाव आल॑.
आजूबाजू n in and around. nearby. जवळपास. uis बस-स्टॅन्ड, रेल्वे-स्टेशन असलते ठामांत अग्गीन जाताना आजूबाजू काय होत आहे म्हणून गवन ठीवींगून असणे चोखोट, कां म्हणजे पॉकटमारणार लोके तिकड अग्गीन भरूनदन असतील.
आजूबाजू n neighbourhood. शेजार. शेदार. uis रिटैर होयाच पुढे एक ल्हान घर बांधांम/बाधांव अस आशा करून अम्ही एक "प्लोट" पाह्याला गेलों. पाह्यलतर, ते एक विजन प्रदेशांत होते ! आजूबाजू घर दुकान काहींनच न्होत॑ !
आजोबा n a term of endearment for grandfather. बापाच बाप अथवा मायाच बापाला स्नेहादरांत बलावाच रीत. uis एक दिवस मझ नातूंडेंच मध्ये एक थोर भांडणे झाल॑. कायम्हणून विचारताना, मझ लोंकाच लेंकरां प्रकार मला "आजा" म्हणून बलावाम अणी मझ लेंकीच लेंकरां प्रकार तस बलावणे चूक आहे, "आजोबा" अस बलावाम हे विषयावर भांडणे होताहे म्हणून कळ्ळ॑ ! "आजा" अणी "आजोबा" हे दोनांची अर्थ एकच म्हणून मी सांगीट्ल नंतर भांडणे शांत झाल॑.
आटा n wheat flour. गहूंच पीठ. uis अम्ही घरच॑ कामवालीकडे महिना-महिना दहा किलो गहूं गिरणीला देवूनपाठीवून आटा करीवून आणणे आहे.
आठ n eight. साताच नंतरल॑ संख्या. uis गेल एक वारांत कॅश्मीरांत आठ आतंगवादी लोकांस अम्च सुरक्षासेना मारले.
आठशें n eight hundred. शंबर गुणा आठ. uis द्वैत तत्वज्ञान प्रचार करलते श्री मध्वाचार्यांच जन्म इसवी 1238 वर्षी, म्हणजे आठशें वर्षाचीन पुढे उडुपीच जवळच पाजकांत झाल॑.
आठांगुळ n a family ritual conducted when a lady is eight month pregnant. गर्वाराच आठवां महिना कराच एक पद्धत ; अठांगळें/अठांगुळें/अठांगूळ in sm. uis अमेरिकांत राह्याच त्यंच लेंकीच आठांगुळ सणला जातों म्हणले तरीन त्यांस जायाला झालनाही म्हणून, नंतर प्रसवाच समयांत गेले.
आड n well. खांडून काढलते पाणीच गाढ कुंड. uis संपाकघराच मागे असाच भाजीपाला अणी फूलाच झाडाला दिवसोडि आडांतून/आडांत्सून पाणी शेंदून घालाच काम मझ डोस्केवर ढकळाला मझ भाऊंडे केलते खेव मला थोडपणीं अवडल॑ नाही.
आडंबर n ostentation. पह्जते पक्षा/पह्जते बरीस जास्ती कराच अलंकार. uis टी.वींत हिंदी सीरियल पाह्ताना खाणीच पक्षा महत्व वेषाच आडंबराला देतात अस वाटत॑.
आडांत घाटलते धोंडा fig a thing set aside irretrievably. हातांतून पूरा सोडूनटाकलते विषय.
आणणे vt to bring. धेवून येणे. uis तजकडून ते पुस्तक घेवून आणणे कित्ति कष्ट म्हणून मला कळेल॑.
आणि n nail. मेख. खिळा. uis घर भाडेला काढतानच भिंतींत आणि काहीं/कोठीन बडिवून हाळ करताने अस अम्हाला घरच मनुष दहा दपा सांगट्ले. Note. from Tamil.
आणे n the coin Anna. अणे. uis ते काळांत चार आणेला दोन इड्ली मिळत होत, पण अत्ता तेच इड्लीला पंध्रा रुपे झालाहे.
आतर adj eager. curious. उत्सुक ; आतुर in sm. uis तो थोड दिवसा पसून/दिवसांतून चिंतांत बसलाहे. तला कायकी मनाच कष्ट झालाहे वाटत॑. काय एकालीन आतर दाखिवत नाही.
आतर adj impatient. अवसर ; आतुर in sm. uis (1) उगे आतर भोग नको. आज सायंकाळि दुकानाला जाताना तुला पह्जते अग्गीन घेऊन देतों. (2) आतर भोग नाका. तीन महिनाचांत/महिनाच्यांत मी तुम्च पैसा पूरा देऊनटाकतों.
आतर adj excited. आतर ; आतुर in sm. uis एरोप्लेन अत्ताच उतरलाहे. आतर भोगनको. तुझ बाप लोक्कुरच प्लेनांतून बाहेर उतरतील.
आतेबहीण n paternal aunt's daughter. अत्याच लेंक. uis मला दोन आतेबहीण होतत्यांत एकली पंध्रा वर्षाच पुढे कॅन्सर रोगांत मरूनगेली.
आतेभाऊ n paternal aunt's son. अत्याच लोंक. uis मला पांच आतेभाऊ आहेत अणी त्यांत तीघदन ऐ.ऐ.टी/ऐ.ऐ.एम केलाहेत.
आत्मदहन n self immolation. स्वता विस्तू घालींगून मरणे. विस्तूनीशी आत्महत्या करींगणे. uis तमिलनाडाच राजनीतींत आत्मदहन करींगणारां विषीन तम्हा-तम्हा ऐकत असतों. तिकडल॑ लोकांस हे वेड स्वभाव कां आल॑की.
आत्मन् n the individual soul. अंतरात्मा. uis मध्व-तत्वज्ञानांत म्हणलतेप्रकार पंचभेदांत आत्मन् अणी ब्रह्मन् हे दोनीं वेगळ वेगळ म्हणून आहे.
आत्मपत्नी n soulmate. wife. बाईल. पत्नी. uis कित्येक होम कराच वेळी अग्निकुंडांत आहुती देतम्हा यजमान अणी आत्मपत्नी हेनी दोघीन मिळून आहुती देमतेस्क असत॑.
आत्मविश्वास n self confidence. स्वंत सामर्थ्यांत असाच विश्वास. uis विश्व बॅडमिनटनात दुसर सर्वउत्तम स्थानांत असाच सैना नेहवालाला तिज खेळावर फार आत्मविश्वास आहे.
आत्मसमर्पण n surrender. दुसरेंच अभय विचारींगून स्वता अर्पणा करींगणे. uis कुवैत युद्धांत अमेरिका एक पूरा महिना प्ळेनांतून बॉम्ब घालून इराक्की सैन्याला ध्वंस करले. तज नंतर इराक्की सैन्याच अवशिष्ट भाग दोन दिवसाचांत आत्मसमर्पण करले.
आत्महत्या n suicide. स्वता प्राण काढणे. uis दुसर लोकयुद्धांत सोवियट-रष्याच सैन्य जर्मनीच बर्ळिन नगरांत प्रवेश करून थोडच वेळांत अडोल्फ हिट्लर आत्महत्या करूनटाकला.
आत्मा n soul. जीव. जीवात्मा. uis मोक्ष मिळापतोरी एक आत्मा पुन्हा-पुन्हा हे संसारांत॑ जन्म काढल॑, अस॑ हिंदू धर्म विश्वास करत॑.
आत्मार्पण n self-surrender. स्वता अर्पण करणे. आत्मसमर्पण. uis भक्तिसिद्धांताच एक मुख्य उद्धेश देवाकडे आत्मार्पण करणे, हेच आहे.
आदर n respect. regard. honour. बहुमान. uis भारताच प्रधानमंत्री श्री. मनमोहन सिंघाच सात्विक गुण अणी विनय स्वभाव हे दोनीं पाव्हून सगळ्यालीं त्यंचवर आदर होयाच काहीं अतिशय नाही.
आदर्श adj an ideal. a model. एक उदाहरणास्क असाच. uis त्यंच वागणाच रीत वेगळ जनतंत्र कक्षींच नेतालोकांला एक चोखोट आदर्श आहे.
आदाय n income. वरुमानम (Tamil). uis भरून जमीन-आस्त कुटुंबावाटे तला मिळ्लतरीन ते सग्ळीन वेगळ लोकांच हाताखाले असाकरतां तला जास्ती आदाय काहीं येत नाही.
आदि n beginning. commencement. आरंभ. प्रारंभ. uis अम्ही थियेटराच आंत जाऊन बसाच पुढेच सिनिमा आरंभ झाल्होत॑. आदि काय झाल म्हणून शेवटोरी कळ्ळ॑च नाही.
आदि n source. उद्भव ठिकाण. uis जॉन स्पेक म्हणणार इसवी 1858 वर्षी आफ्रिकाच नैल नदीच आदि कोठ आहे म्हणून कळींगाच श्रमांत सार्थक झाले.
आदि adj principal. chief. प्रमुख. मुख्य. uis ऋग्वेदाला हिंदूधर्माच आदि ग्रंथ म्हणून सांगतों.
आदि adj first. पह्यिलच. आद्य. uis हिंदू धर्मांत आदि मनुषाच नाव आहे मनु, अणी क्रिस्तु धर्मांत आदि मनुषाच नाव आहे आदम.
आदित्य n Sun. सूर्य. भानु. रवि. मार्तांड. uis आदित्य म्हणजे अदितिच पुत्र अस ऋग्वेदांत आहे.
आदित्यवार n Sunday. आयितवार. अयितवार. रविवार. भानुवार. uis आदित्य, रवि अणी भानु, हे तीनीं सूर्याच नाव आहे अणी आदित्याच अपभ्रष्ट रूप आहे "अयित" अथवा "आयित".
आदेश n instruction. a given mandate. आज्ञा. uis एक चूक काम करून स्वताच व॑र आरोप येयीनास्क असाला कित्येकदन त्यंच काम थोरळेंच आदेशाच प्रकार केरलों म्हणून सांगणे आहे.
आद्य adj first. initial. पहिलच. प्रारंभाच. आदिच. uis काल अम्ही श्रीमती एम.एस. सुब्बलक्ष्मीच कचेरी ऐकला गेल्होतों. तजांत मला तेनि आद्य सांगीट्लते गाणे उदंड अवडल॑.
आद्यंत adv from beginning to end. संपूर्ण. आद्य पसून शेवटी पर्यंतीन. uis तद्दी संध्याकाळी अम्हास वेगळ एक ठिकाणी जामते होत॑ तरीन कचेरी फार बेष होत॑ म्हणून अम्ही आद्यंत बसून ऐकलों.
आधार n basis. आधार. uis मझ विरुद्ध घाट्लते केसांत आधार काहीं नाही म्हणून कोर्टांत ढकळूनटाकले.
आधार n evidence. प्रमाणाच आधार. uis मंगळ ग्रहांत फार जुने काळांत वाहाच पाणी होत॑ म्हणून तिकडून मिळ्लते आधारांतून कळते.
आधुनिक adj modern. नव॑ काळाच. नवीन. uis अम्च देशाच युवलोके आधुनिक शास्त्रांत फार षाणे/शाणे म्हणून नाव घेट्लाहेत.
आध्यात्मिक adj relating to the Supreme Spirit or one's own spirit. ब्रह्मज्ञानाच विषय. uis बौधधर्माच प्रचारणामळे लोकांमध्ये हिंदूधर्माच आचरण फार उणे स्थितीला गेलस्ताना आदिशंकराचार्या हिंदूधर्माच आध्यात्मिकत्व आधार करून अद्वैतसिद्धांत पुढे ठिवलतामळे हिंदूधर्म भारतांत पुन्हा उंच स्थितीला आल॑.
आनंद n happiness. joy. संतोष. uis अम्ही भारतांतून आलों, अम्हीपणीं हिंदूधर्म आचरण करतों, अस इंदोनेश्याच बाली देशवासींकडे सांगताना त्यांस फार आनंद वाटाच पाह्यलों.
आपत n calamity. दुर्घटना. विपत. आफत. uis युक्रेन देशाच चेर्णोबिल अणुशक्ती केद्रांत झालते दुर्घटना रक्षा नियंत्रण चुकलतर होयाच आपताच एक उदाहरण आहे.
आफत n calamity. दुर्घटना. विपत. आपत. uis सी.पी.ऐ.(माओ) पक्ष पुन्हा-पुन्हा त्यंच स्वाधीना्च खाले असाच प्रदेशांत रेल्वे-ट्राकाला उडीवून नाश कराच एक मोठ॑ चिंताच विषय झालाहे. हे आफतांतून चुकिवाला अता-अता/समीपांत केंद्र सरकार रेल्वेच अपाय उणे करिवाला उपयोग होयाच एक उपकरण वापराला निश्चय केलाहेत.
आभरण n ornaments. नग. नेग. माळमत्ता. uis सोनेच मोल दिवसों-दिवसा जास्ती होताहे म्हणून अत्ता "एक-ग्राम" सोनेच आभरण फार प्रसिद्ध झालाहे.
आभार n thanks. धन्यवाद. uis लटक आरोपाच केसांतून चुकिवलत्याला तेनी त्यंच वकीलला उदंड आभार प्रकट केले.
आमंत्रण n invitation. आवंतण. स्वागत चिट्टी. निमंत्रण. uis शतरंजांत विश्वांत सर्वउंच स्थानांत असणार श्री. विश्वनाथन आनंदाला एक होनररि डॉक्टरेट देऊन मर्यादा कराला हैदरबाद विश्वविद्यापीठ आमंत्रण पत्र त्यांस पाठिवले. पण, केंद्र मानुषिक विकास मंत्रालयाच अधिकारींच मूर्खपणामळे ते होनररि डॉक्टरेट त्यास द्याला झाल नाही.
आया n female helper. सहाय करणारि. uis कुवैत, सौदि-अरेबिया, यु.ए.इ. असल देशांत भारत, श्रीलंका असल॑ देशांतून जायाच आया लोकांच बरोर तिकडल॑ लोक फार दुष्ट रीतींत वागाच विषीन पत्रांत तम्हा-तम्हा/मधे-मधे येत अस्त॑.
आयास n exertion. toil. pains. प्रयत्न. श्रम. कष्ट. uis पाप ! एवढ॑ आयास घेऊन/करून विदेशांत कष्टिभोगाच हे आयालोकांच गेत पाह्यलतर परिताप वाटत॑.
आयुध n weapon. युधाच उपकरण. uis पांडव अज्ञातवास आरंभ करा्च पुढे त्यंच आयुध पूराहीं गांठोड बांधून एक आपटा-वृक्षाच (शमी-वृक्षाच) वर लोंबिऊन ठिवले. दुसरेंना ते गांठोड एक मृतदेह लोंबून असास्क दिसून देत होत॑.
आयुर्वेद n system of Indian medical treatment using herbal, plant and natural extracts. देशी चिकित्सा विधी. uis आयुर्वेदाच ओखद/औषध अणी चिकित्सा पद्धतीला अलोपतीच तेवढे शास्त्राच आधार नाहीतरीन कित्येक रोगाला ते फारच योग्य अस्त॑.
आयुष n lifetime. जीवितकाळ ; आयुष्य in SM. uis (1) वंगळकी, चोखटकी वाट कोणत तरीन असूनदे, करोरपती (कोटीश्वर) होम म्हणून तला मनांत उदंड आहे. पण हे आयुषांत तो कोटीश्वर होय़ाल जातनाही म्हणून मी लिव्हून देतों. (2) श्रीनिवास रामानुजन ह्यंच आयुष ल्हान होत॑ तरीन गणितशास्त्राला त्यंच संभावना फारच महत्व होत॑.
आयुषहोम n a homa praying for long, healthy and rewarding life. श्रेष्ट जीवनाकरतां कराच एक होम. uis उदंड दिवस तेनी/त्यानी आंगाला बर नाहीस्क होते अणी घरांत वेगळ कायकायकी प्रश्न पणीन होत म्हणून अता समीपांत आयुष होम करीवले म्हणून ऐकलों.
आयुष्मान n a person who lives for a very long time. दीर्घायुष असणार. uis थोरळेंस नमस्कार करताना त्यनी अम्हाला "आयुषमान भवा" म्हणून आशीर्वाद करणे आहे. म्हण्जे, अम्हाला दीर्घ आयूष होऊनदे म्हणून सांगतात.
आयोजन n plan. arrangements. भावी योजना. uis तीन महिनेच पुढे केंद्र सरकार जी.एस.टी करनियम आणिवले अणी तज पुढे गेल वर्ष काळ॑पैसे नियंत्रण कराला म्हणून नोट-बंध नियम आणिवले. हे दोन नियमामळे देशाच अर्थव्यवस्था मोस होयाच लक्षण आहे म्हणून ते सुधारिवाला बॅन्कांच सांपतिक स्थिती घट्टी करिवून व्यापार-व्यवसायाला प्रोत्साहन द्याच एक आयोजन समीपांत घोषणा केलाहेत.
आरण्य adj relating to the wild or forest. विजन अथवा राणाला संबंध झालते. uis श्रीराम, सीतादेवी अण्खी लक्ष्मण हेन्च चौदा वर्षाच आरण्यवासांत तेरा वर्ष झाल नंतरच सीतादेवीच अपहरणीं विमोचनीं झालते.
आरती n performing puja by waving sacred lamp in a circular motion in front of idols of Gods. देवाला तूपाच वातांत अथवा कर्पूरार्ती दाख्वून पूजा करणे. uis कित्येक लोक देवपूजाच आरतीला कर्पूरार्तीच पक्षा तूप लावलते कापूसाच (रुईच) वाताच आरती करणेच श्रेष्ट म्हण्तात.
आरंभ n the beginning. the start. प्रारंभ. uis हे ब्रह्मांडाच आरंभ "बिग-बॅन्ग तियरि" प्रकार एक मोठ॑ विस्फोटांतून झाल अस शास्त्रज्ञ सांगतात.
आराधना n worship. prayer. पूजा. uis तिरुपती श्री बालाजी देऊळांत ब्रह्मोत्सव पूजा आराधना कराला निश्चय केलते रोक्कम, म्हणजे 25,000 रुपे दोन वर्षापुढेच बांधाम/बांधांव.
आराधना n an annual religious ceremony in memory of a saint who entered his brindavana. यतींच ब्रिंदावन प्रवेश केलते दिवसाच वार्षिक पूजा. uis श्री राघवेन्द्रस्वामींच आराधना प्रतिवर्ष श्रावण महिना क्रिष्णपक्षाच द्वितीय दिवस करतात. ते तीन दिवसाच कार्यक्रम अस्त॑.
आराम n rest. relaxation. comfort. ease. सुख. स्वस्थ. हायशी असणे. uis रिटैर झाल नंतर आराम होऊन बसूया म्हणींगलों, पण खरे सांगाम/सांगांव म्हणजे मला अत्ता कसालीन वेळ नाही ! Note:- हायसे in sm means 'feeling of relief'.
आरोग्य n health. रोग नाहीस्क असणे. uis पैसे किती असलतरीन आरोग्य नाहीतर मनुषाला सुख असना.
आरोप n accusation. दोष सांगणे. चूक सांगणे. uis विनायक चतुर्थी दिवस चंद्राला पाह्यणारांवर चोर्टपणाच अरोप होईल अस सांगाच मागे एक खाणी आहे.
आरोपी n the accused. आरोप झालते व्यक्ती. uis न्यायालयांत निर्णय होयापर्यंतीन एक आरोपीला दोषी म्हणून सांगताने म्हणून आहे.
आरोहण n climbing. ascending. mounting. वेघणे. uis तेन्ज़िंग नोरगे अणी न्यूज़िलंडाच सर. एड्मंड हिल्लरी एवरस्ट शिखराच आरोहण पहिले-पहिले इसवी 1952 मधे केले.
आरोहण n ascending or mounting ceremonially. आसनांत वेधून बसणे uis इसवी 2015 वर्षाच मैसूर दस्सरा उत्सवाच वेळी ते राज्याच नव॑ राजाच सिंहासन आरोहणाच सण झाल॑.
आर्भाट n a tumultuous demonstration. थोर संब्रमाच अवस्था. uis अमेरिकांत एक पांच वर्षाच पोरी तिला पह्जते मिळ्ल॑ नाही म्हणून थोर आर्भाट केलते टी.वींतत॑ दाखिवले.
आर्य adj noble. venerable. श्रेष्ट. uis थोर थोर मनुषांला "आर्य" म्हणून बलावाच विना, नाव सांगून बलावणे त्यांस अपमान कराच तुल्य म्हणून धारणा आहे.
आर्य n Aryans. आर्यवंशाच लोक. uis सुमार 2500 वर्षाच पुढे सिंधू नदीच आजू-बाजू मोहन-ज-दारो, हरप्पा असल॑ ठिकाणी विकास झालते संस्कृती आर्य वंशलोकांच न्हो, पण द्राविड वंशलोकांच आहे अस पुरावस्तू अन्वेषणा प्रकार सिद्धांत झालाहे.
आलय n dwelling place. राह्याच ठिकाण. वास स्थळ. uis हिमाच आलय म्हणाकरतां ते परवताला हिमालया म्हणून नाव आल॑.
आलस n lazyness. शोंबेरिपण (Tamil) ; आलस्य in sm. uis दुपारच वेळ झोंपी जाणे आलसाच पहिलच लक्षण आहे अस ऐकल नंतर मी ते दंडक सोडूनटाकलों !
आल॑ n undried ginger. अल॑. ओल/हिरव सुंठ ; आले in sm. uis अजीर्णांतून अवस्था भोगताना आलाच रायत खाणे चोखोट म्हणतात.
आल॑ खालते माकडाच तोंडास्क fig an expression meaning "(caught with) a perplexing and confused expression while doing something which turned out to be totally unnecessary and unpalatable". थोडकीन आवश्य नाहीते काम करत असताना सांपडींगून मनाच गोंधळ दाखिवणे.
आलाप n tuning of voice in preparation to singing. गाणे आरंभ करा्च पुढे गाणेच योग्य प्रकार घसाच शब्द तयार करणे. uis हिंदुस्थानी अणी कर्णाटक संगीत हे दोनाचीं मध्ये अलापानाच समयांत फार व्यत्यास अस्त॑.
आलाप fig whining on and on. indulging in endless complaining. सोडनास्क आरोप करणे. uis तिला घरांत निम्मतीच नाही म्हणून अस्गीदनालीं कळून असेल तरीन तिज आलाप(ना) ऐकाला कोणालीन इष्ट/समय/वेळ नाही.
आलिंगन n embrace. भेटींगणे. uis "मझ भाऊच तुल्य तू आहेस" अस सांगून श्रीराम हनुमंताला भेटींगून आलिंगन कराच रूप अठींगलतर अम्च मनांत हे दोघेंच वर असाच भक्ती जास्ती वाढते. Note.भेटणे in sm means meeting & also embracing.
आलूगड्डे n potato. उरळेगड्डे. भोईच खाले मुळांत वाढाच एक गड्डा. uis आलूगड्डेच भाजी, आलूगड्डेच बोंडा, आलूगड्डेच उप्पेरी, आलूगड्डेच फ्रेंच-फ्रैस हे तेवढीन मला उदंड अवडत॑.
आलूबोंडा n potato bonda. उरळेगड्डेंत केलते बोंडा. uis महाराष्ट्रांत आलूबोंडाला बटाटा-वडा म्हण्तात.
आलोचना n contemplation. गाढ विचार. uis एवढ॑ दिवसाच मनस्तापाच नंतर मझ बरोर बोलाम/बोलांव म्हणून सांगून पाठिवलत्याला फार संतोषच. पण केम्हा मिळूया म्हणून मी आलोचना केलांपिरी तुम्हाला कळिवतों. Note. आलोचना in sm means ’criticism' ,’a review'.
आवक्काई n a type of mango pickles. एक विधाच अंबाच लोणचे. uis आवक्काई लोणचे करताना अंबाला गोट्टीनिशी चिरून घालणे आहे. Note. from Telugu.
आवर्तन n repetition. पुन्हा-पुन्हा होणे. पुन्हाहीं-पुन्हाहीं होणे. uis अजीर्णाच आवर्तन असलतर, दिवसोडि मंडि-सांभारभातीं फणसाच भाजीईं खायाच राह्त करून डॉक्टराला पाह्णे चोखोट !
आवळणे vt to press and tighten. ओढून चेंपणे. होढून चेंपणे. uis बेष आवाळून बांधून ठिवतात तरीन कापूसाच मंडींत गेलतर रुईच धूळ आंग पूरा लागून श्वास कराला पणीन तंटा होयास्क होऊनजात॑.
आवश्य n necessity. पह्जते. uis (1) आवश्य म्हणजे "पह्जते" अणी अवश्य म्हणजे अगत्य अस हे दोन शब्दांच अर्थांत व्यत्यास आहे म्हणून कित्येकदनाला कळना. (2) सूर्याला प्रदक्षिणा कराच आठ ग्रहांत भूमीला मात्र जीव उत्भव/संरक्षणा कराला आवश्याजोक्त वातावरण आहे. (3) हे काम पूरा कराला काय-काय आवश्य आहेकी ते पूरा अम्च गांवांतच मिळल अणी तुम्ही ते अग्गीन तुम्च गावाण्तून पाठीवून द्याच आवश्य नाही.
आवाहन n invocation of a deity. पूजाच वेळी देवाला प्रार्थना करून सानिध्य करणे. uis पूजा आरंभ करताना देवाच आवाहन करून नंतरच वेगळ काहीं करणे.
आविष्करण vi manifesting. प्रकट होणे. uis अत्ता-अत्ताच अम्च गांवांत/गामांत सिद्धिविनायक देऊळ जीर्णोद्धार करून गणेशाच विग्रहाला पुनरप्रतिष्टापना केले. हे कार्यक्रमांत शेवटीच भाग, म्हण्जे, विग्रहांत देवाच आविष्करण करणे उरलाहे. याच भाद्रपदमास विनायक चतुर्थीच पुढे हे होईल म्हणतात.
आविष्कार n manifestation. प्रकटन. प्रदर्शन. uis विग्रहांत देवाच आविष्कार झाला नंतरच देऊळ पूजाला उघडतील म्हणून देऊळाच सेक्रटरि सांगट्ले.
आवेश n possessed by God spirit. देव आंगावर येणे. uis भद्रकाळी देऊळांत गेलंदा झालते उत्सवाच वेळी देवीच आवेश आचारेच लोंकच आंगावर येऊन तेनी फार अट्टहास करून नंतर मूर्च्छ येऊन पडले.
आवेश n possessed by spirit. भूत आंगाला येणे. uis भूत-पिशाचाच आवेश धरलत्यांस नामक्कल नामगिरी देऊळांत बलाईंगून गेलतर बर होईल म्हणतात.
आवेश n uncontrolled excitement. नियंत्रण कराला होयना तेवढ॑ उत्साह. uis वीरेन्द्र शेहवाग खेळाच पाह्याला आलते लोकांच आवेश पाह्यलतर कोणालीन आश्चर्य वाटनास्क असना.
आशय n principle. meaning. purport. मूल अर्थ. आंतल॑ अर्थ. uis कोंतीन एक नव विषयाच आशय कळींगट्लतर ते लोक्कर मनांत दृढ होऊन राहील.
आशय n intention. purpose. उद्देश. uis ईस्ट इंडिया कंपनी भारताला येताना त्यंच उद्धेश व्यापर होत॑. नंतर एक साम्रज्य हाताखाले करींगाला वाट पाह्यले. भारताच अनेक राजा, महाराजा अणी मुगळ साम्राट यांस ईस्ट इंडिया कंपनीच हे आशय कळींगाजोरी त्यंच राज्य सर्वीन/पूराहीं हातांतून सोडून गेल॑/नष्ट झाल॑.
आशंका n apprehension. misgiving. diffidence. doubt. भेंमळे होयाच संशय. uis बोर-आडांत॑ पडलते ल्हान लेंकराला बाह्येर काढजोरी पूरा गांवांला फार आशंका वाटत होत॑.
आशा n hope. expectation with desire. इच्छा. uis अमेरिकाच जुने राष्ट्रपती बुषाच लोकनीतीच वर अनेक देशांच लोकांला फार संदेह होत॑. बारक ओबामा नव राष्ट्रपती झाल॑ नंतर अमेरिकाच लोकनीतींत इथपर व्यत्यास येईलकी कायकी..
आशा n desire. इच्छा. uis PUC परीक्षांत चोखोट/चोखट मार्क्स घेटला तरीन नंतर BE की MBBS की कराला मझ लोंकाला इष्टेच होत नाही. नुस्त BA (History) कराम/करांव म्हणून मझकडे उदंड विचारींगट्ला. शेवटी तज आशा प्रकारच होऊनदे म्हणून सोडूनटाकलों.
आशा दाखिवणे vt to tempt. मोह आणिवणे. uis वराडाच नंतर सुख-सौकर्यांन राहूया म्हणून आशा दाखिवून भरून पैसावंत अरबी म्हातारे अम्च देशाला येऊन गरीब मुस्लीम कुटुंबाच पोरींस वराड करींगून जायाच विषय मध्य मध्य वर्तमान पत्रांत येत असत॑ तरीन ते अन्याय होतेच अस्त॑.
आशा भोगणे vi to get tempted. मोह येणे. uis थोर घराच नवरा म्हणून आशा भोगून मझ मित्र एकले त्यंच लेंकीच वराड निश्चय केलेतरीन, नवराच घरच लोके गुंडागिरी, चोर्ट कॉण्ट्राक्ट कामा वाटे सरकाराच पैसे गडप करणे असलते कामांत अग्गीन आहेत म्हणून कळून वराड राह्ते करून टाकले.
आशीर्वाद n blessings. अनुग्रह. uis मझ सौभाग्य मझ षाणपणामळे काही नोहो. अस्कीन थोरळेंच आशीर्वागामळेच ते.
आश्चर्य n astonishment. दंग. विस्मय. uis चाळीस वर्षापुढे मनुष चंद्रग्रहाला जाऊन आलते अठींगताना आजपणीं अम्हाला आश्चर्य वाटत॑.
आश्रम n hermitage. ऋषीमुनींच वासस्थान. uis लक्ष्मण सीतादेवीला राणांत सोडलतम्हा त्यांस वाल्मीकी मुनी त्यंच आश्रमाला बलाईंगून गेले.
आश्रम n name of the four stages in a man's life. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ अणी सन्यास अस एक मनुषाच जीवनांतल॑ चार आश्रम. uis साधारण होऊन ब्रह्मचर्य, गृहस्थ हे दोन आश्रम होऊनच सरते तरीन वानप्रस्थ अणी सन्यास हे दोन आश्रम आचरण करणे अपरूपच.
आश्रय n protection. shelter. रक्षा. संरक्षणा. uis त्यंच चोखोट उपदेश ऐकाला तयार नाहीते रावणाला सोडून विभीषणा श्रीरामाच आश्रयाला आले.
आश्रय n dependence. support. आश्रय. uis वय होतां-होतां आंगाच बळ उणे होणे सहजच तरीन, प्रत्येक कामालीन/कार्यालीन दुसरेंच आश्रयांत असणे अनेक लोकांस अवडना/उणवता वाटते.
आश्रय n asylum. refuge. shelter. आश्रय. uis श्रीलंकात झालते युद्धामळे तिकडले अनेक तमिल लोक अम्च देशांत आश्रय विचारून आले. पण, तिकडले युद्ध संपला नंतर यथे आश्रय घेट्लते लोके परतून गेलते विषय कोण्त पत्रांतीं मी वाचलों नाही.
आश्वास n assurance. वचन (देणे/मिळणे). uis तुज एवढे दिवसाच वागणे पाह्यलतर तुला विसंबाला मी तयार नाही. मला मझ पैसा परतून मिळल अस आश्वास मिळापर्यंतीन/मिळापतोरी मी तुला एक दंबडि पणीं रीण देईना.
आश्वास n mental comfort. consolation. मनाच समाधान. uis मी सोसाच कष्टाला कायतरीन परिणाम आहेका म्हणून त्यंचकडे विचाराला जायाच पुढे तेनी तिकडे आहेतका म्हणून कळ्ळतर मला आश्वास वाटल.
आश्विज n seventh month of the Saka year. आश्विन महिना. अश्विन महिना. हिंदू पंचांगांत सातवां महिना. uis हे वर्षाच नरक चतुर्दशी सण आश्विज महिनेच कृष्णपक्ष चतुर्दशी दिवसी येत॑.
आश्विन n seventh month of the Saka year. आश्विज महिना. अश्विन महिना. हिंदू पंचांगांत सातवां महिना. uis हे वर्षाच धन-त्रयोदशी सण आश्विन महिनेच कृष्णपक्ष त्रयोदशी दिवसी येते.
आषाढ n fourth month of the Hindu year. हिंदू पंचांगांत चौथावां महिना. uis मलखेडा श्री जयतीर्थस्वामीच सहाशेंपन्नासवां पुण्यदिवस हे वर्ष आषाढ महिनेच शुक्लपक्ष पंचमी दिवसी झाल॑.
आसन n yoga posture. योगासन. uis योगाच कित्येक आसन कराला आंग दोन तीन ठिकाणी वक्र केलतरच होईल म्हणून, ते मझान होईनाते काम म्हणून सोडूनटाकलों.
आसन n seat. बसाच ठिकाण. uis रामदूत हनुमंताला रावणा्च समोर/सोमोर बसाला आसन देल नाही म्हणून तेनी त्यंच पूंस आवश्याच प्रकार लांब करून भोईंवर ते वृत्ताकारांत गुंडालींगून गुंडाळींगून रावणाच सिंहासनापक्षा/बरीस उंच आसन करींगून बसले.
आसपत्रि n hospital. आसपत्रि. uis सरकारी आसपत्रींत॑ गरीब लोकांस॑ पैसाच खर्च नाहीस्क॑ ओखदीं डॉक्टरांच॑ (वैद्यांच॑) सेवाईं मिळेल म्हणून आहे, पण, वास्तव काय म्हण्जे भरून सरकारी आसपत्रींत॑ तिकड जाणार गरीबांकडूनपणीं पैस उप्पडतात॑.
आसामी n fellow. guy. एकला. एक मनुष. uis तो एक बरोरल॑ आसामी ! लटक-लबाड बडिवणेंत षाणा ! Note.from Tamil. usually said in a sarcastic manner.
आस्त n wealth. संपत्त. धन. आस्ती. uis मिळ्ळते आस्त पूरा पूड-पुठाणी करूनटाकून तो अत्ता देऊळ-बीदींत भीक मागत बसलाहे.
आस्तिक n theist. one who believes in God or a Super Power. देव/परमात्मा आहे अस विश्वास करणार. uis आस्तिक लोकांस मस्करी करणे म्हणजे कित्येक नास्तिकवादींस कायकी संतोष वाटत॑.
आस्तिकवाद n doctrine of theism. आस्तिक तत्वज्ञान. uis भारतास्क एक जनतंत्र अणी निधर्म देशांत आस्तिकवादाला ठिकाण नाही म्हणणे चूक म्हणून कित्येक मूर्ख लोकांस कळत नाही.
आस्ती n wealth. संपत्त. धन. आस्त. uis चार पांच पिढींतून आस्ती वांटा करनाते ते कुटुंबांत अत्ता ते विषय एक थोर अवघड स्थितींत येऊन बसलाहे.
आस्वाद n relish. अवडींगून (स्वाद) धेणे. uis आस्वादांत जेवत अस्ताना भरलते लोटा लवंडून/लंबडून पानांत पूराईं पाणी सांडल॑.
आहाओहो n an expression indicating an excellent performance. kudos. फार प्रमाद विषया विषीन प्रशंसा व्यक्त कराच गोष्ट. uis साळेंत वाचताना मझ षाणपण आहाओहो म्हणून सांगाला होईना तरीन, ते ते दिवसाच पाठ अस्कीन पूरा वाचून मनांत कराच विषयांत मला कोणीन चूक सांगाला होईना.
आहार n food. जेवण. uis तळून कराच आहारापक्षा शिजिवून कराच आहार आंगाला चोखोट अस डॉक्टर म्हणतात.
आहुती n oblation offered to gods with ghee through sacred homa-fire. होमकुंडाच अग्नींत होत्र देणे. uis होमकुंडांत द्याच आहुती अमुक अमुक देवाला अग्निदेव पोंचिवतात॑ अस॑ अम्ही विश्वास करतों.
आहे vi a form of affirmation indicating presence. to be. असणे. uis प्रयाणाला जाताना हातराखणेला पैसा असना म्हणून भींगनाकांत. मझकडे आवश्याजोक्त आहे.
आहेर n gift. स्नेहांत अथवा आदरांत द्याच वस्तू. uis अम्चकडे उरलते वस्तू आहेर म्हणून द्या पक्षा अम्हाला अवडलते वस्तू आहेर म्हणून देलतर तज महत्व वेगळेच.
आह्लाद n delight. संतोष. आनंद. uis लेंकरांना त्यांस इष्ट झालते बावोली/भावोली मिळताना होयाच आह्लाद एक शुद्ध आह्लाद म्हणूया.
आक्षेप n objection. विरोध. आक्षेपण. uis (1) मला एवढ॑ सामान उचलींगून येयाला होयना. तुम्हाला आक्षेप नाहीतर हे एक डब्बा/सामान तुम्ही आणतांत का ? (2) हे केळ मीच अर्ध सोलून ठिवलते. तुम्हाला आक्षेप नाहीतर खांत.
आक्षेपण n disallowing or declining. विसम्मत करणे. uis मझ बरोर रिटैर झालते लोकांला मझ पक्षा जास्ति पेन्षन मिळाच पाव्हून मी पेन्षन अधिकारीला एक अर्जी देलों. पण, तेनि सरकाराच काहींएक आक्षेपण सांगून मझ अर्जी संम्मत केल नाही.
आज्ञा n order. command. निर्देश. आज्ञापन. uis आज्ञाच विरुद्ध काहि तरीन केलतर "कोर्टमारषल" होईल म्हणून सेनाच उद्योगांत असणारांला कळेल.
आज्ञापन n ordering. directing. proclamation. निर्देश. आज्ञा. uis जुने काळांत, म्हणजे जनतंत्र येयाच पुढे राजा महाराजांच काळांत आवश्याजोक्त वेळा-वेळी आज्ञापन देऊन राजभार करत होते.
आज्ञार्थ n imperative (gram). (व्याकरणांत) आज्ञा दाखिवाच गोष्ट.
आंग n body. देह. शरीर ; अंग in sm. uis हीम्हाळांत बाहेर जाताना आंग बरोर पांघरींगून जाणे चोखोट/चोखट.
आंग उतरणे vi to become emaciated. आरोग्य उणे होयामळे रोडे होणे. uis तीन चार वर्षाच नंतर मझ मित्राला पाह्ताना त्यंच आंग उतरून गेलत्यास्क दिसल॑ मला. विचारताना कळ्ल॑, डयबीटस रोगामळे अस झाल म्हणून.
आंगधूणे vt bathing. ablution. आंग धुवणे. स्नान करणे. नाहणे. अंघोळ करणे. अंघूळ करणे. आंघोळी करणे. आंघोळ करणे. आंघूळ करणे ; अंगधुणे in sm. uis कित्येक मठाला जाऊन सोवळेच कार्यक्रमाला आंगधूणे कराला मला थोडक संकोच वाटल, कां म्हणजे, आडांतून पाणी शेंदून तिकडेच उघड ठिकाणी स्नान करामकी म्हणून.
आंगधुवणे vt bathing. ablution. आंगधूणे. स्नान करणे. नाहणे. अंघोळ करणे. अंघूळ करणे. आंघोळी करणे. आंघोळ करणे. आंघूळ करणे ; अंगधुणे in sm. uis तीर्थक्षेत्राला जाणार कित्येकदन तिकडल॑ नदींत आंगधुवून कापड धुवून वाळिवून सोवळेंत येऊन देवदर्शन करतील.
आंगमोडा n stretching the body to relax. आंगमोडा. uis हायशि ओढून/होढून आंगमोडा देत असताना मला गळाच एक पटीस लचक धरल॑.
आंगरखा n shirt worn by men. अंगरका. अंगर्का. अंगी. uis दादिगेंच आंग राखिवून ठिवाच वस्त्राला आंगरखा अथवा आंगराखा म्हणतात.
आंगाला-येणे id to be possessed by good or evil spirit. देव नाहीतर भूत आंगाला येणे. uis मसूरी रोग आलतर, देवी आंगाला आले अस सांगणे आहे.
आंगाला-होणे id to be exhausted after feeling ill. आंगाला नित्राण हेणे. uis मी चार दिवस डिंगी (डिंगू) जेरांत निजून पडल्होतों. आजच आंघोळी केलते. आंगाला होत नाही म्हणून काय काम करालीन सध्याला होईना.
आंघूळ n bathing. आंघोळ. आंघोळी. अंघोळ. अंघूळ. स्नान. नाहणे. uis उनू पाणींत आंघूळ करींगून समेच फंकाच खाले ओठाकलतर आंगाला चोखोट नहो म्हणतील.
आंघोळ n bathing. आंघूळ. आंघोळी. अंघोळ. अंघूळ. स्नान. नाहणे. uis खेडेगांवांच लोके आंघोळ कराला कुंड नाहीतर नदीला जाणे आहे.
आंघोळी n bathing. आंघूळ. आंघोळ. अंघोळ. अंघूळ. स्नान. नाहणे. uis टैफोय्ड जेरांत दहा दिवस निजल्होतता आजच आंघोळी करला.
आंतल॑ adj internal. that which is inside. आंत असाच. uis तो एवढ॑ दिवस मझकडे जास्ती बोलत होत नाही. एक वारापसून लाडी-गोडी बोलाला आरंभ केलाहे.आंतल॑ विषय काय म्हणून कळत नाही !
आंत adv inside (portion). आंतल॑ भाग ; आत in sm. uis कवाड उघडून खोलीच आंत काय आहे पाह.
आंताड n intestine. gut. bowel. पोटांतल॑ जीर्णाच अवयव ; अंतडे in sm. uis हिरण्यकशिपूच आंतडी उग्रनरसिम्हदेव तज पोटांतून काढून ते राक्षसाला वध करताना भूलोकांत प्रह्ळादाला विना दुसर कोणालीन देवाला शांत कराला झाल नाही.
आंतून adv from inside. from within. आंतल॑ भागांतून. uis संपाकघरांतून चोखोट/चोखट गोढसाराच/गोडसाराच घम-घम वास येत आहे !
आंदोलन n a mass social movement or agitation. समुदायांत परिवर्तन आणिवाला कराच एक सामूहिक कार्यक्रम. uis स्वातंत्र्य समराच "स्वदेशी" आंदोलनाच समय महात्मा गांधि लोकांला चर्खाच प्रयोग कराला प्रेरणा केले.
आंबोडे n a fried eatable made of dhals. दाळांतूं तळून केलते एक खायाच पदार्थ. uis अम्च घरांत सणाच संपाक म्हण्जे आंबोडे नाहीस्क असना. Note. from Kannada.
आंसूं n tear. असूं. डोळेंतून येयाच पाणी ; असूं/आसूं in sm. uis ते चुम्मणी पोरीला पाह. डोळेंतून आंसूं येत आहे. कायकी खोडी केलतेला/केलत्याला तिज माय शिवा देलसेल/धटावलसेल.
No comments:
Post a Comment