07 March 2012

च, छ







च the sixth  consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच सहावां व्यंजन॑.

चक्कर n  a circle. a round. a ring. चक्र.

चक्कर n  an aimless walk. कोठीन जायाच उद्देश नाहीस्क उगे चालणे. uis दोन दिवसापसून तो अम्च॑ घराच जवळेच चक्कर बडिवत आहे. कां म्हणून कळत नाही.

चक्कर n  vertigo. डोस्के फिरणे. uis एक दोन महिने पसून डोस्केच चक्कर येत आहे म्हणत आहे तो. कां डॉक्टराचकडे जाऊन दाखिवताने ? 

चक्कर बडिवणे adj to loiter around. उद्देश नाहीस्क॑ फिरणे. uis मी पाष्टे पसून पाह्त आहें. तो अम्च घराच समोरच चक्कर बडिवत आहे.

चक्का n  separated milk solids. दूधांतून काढाच घट्टि पदार्थ. uis दूधाच चक्कांतून रसोगोळ्ळा करणे आहे.

चक्कि n   flour mill. पीठाच गिरणी. uis चप्पात्ति कराला म्हणून महिना महिना अम्ही पांच किलो गेहूं चक्कीला पाठिवून पूड करून ठिवणे आहे.

चक्कोट adj  good. fine. excellent. ओंगळाच विरुद्ध. चोक्कोट. चखोट. चोखोट. चोखट ; चोखट/चखोट in sm.  Note :- better चोखट. चोख in MM means "clean, pure, apt, good" etc. uis चक्कोट गोष्ट सांगून ऐकनातर॑ तला दोन रपाटा घालून (होडून) वाटेला आणीवाम॑.

चक्कोट तेल n  gingili oil. sesame oil. तीळाच तेल. चोक्कोट/चखोट/चोखोट/चोखट तेल. uis देवाच॑ दिवा चक्कोट तेलांत॑च लावाम म्हणाच पद्धताच आधार काय म्हणून कळत नाही. ते सवंग होत म्हणाकरतांकी कायकी. Note :- better चोखट तेल. This word appears to be a direct transliteration from the Tamil word नल्लेण्णै, meaning "good-oil". The Tamil word itself appears to be morphed from एळ्ळेण्णै, "एळ्ळु" in Tamil meaning "sesame".   

चक्र n   wheel. चक्र. uis महाभारत युद्धांत॑ कर्णाच रथाच चक्र चिक्कोलांत॑ सांपडून असताना शस्त्र प्रयोग करून अर्जुना त्यांस॑ वध केले.

चक्रवर्ति n  emperor. साम्राट. uis चक्रवर्ति अशोक भारताच इतिहासांत॑ पहिले-पहिलेच चक्रवर्ति होते.

चक्रव्यूह n  one of a type of battle formations of infantry, cavalry, elephant corps and chariot corps in  ancient armies. जुने काळांत॑ युद्धभूमींत करसेना, अश्वसेना, हस्तसेना अणी रथसेनाच गुंप तय्यार कराच विध-विध व्यवस्थांत॑ एक. uis महाभारत युद्धांत॑ अभिमन्युला चक्रव्यूह छेद करून आंत वेघाला कळ्ल॑ होत विना कस॑ तजांतून बाहेर कस॑ येणे, हे कळ्ल॑ होत नाही.

चक्रायुध॑ n  the discus weapon. चक्राच आकाराच एक आयुध॑. uis श्रीक्रिष्णभगवान चक्रायुध प्रयोग केलतर॑ तजांतून कोणालीन चुकाला होयना.

चक्रांकित॑ n  a type of white coral carapace found in shallow seas and having small circular scars formed by a marine crustacean community. This is venerated like saligram by Vaishnavites. वैष्णव संप्रदायांते साळिग्रामास्क॑ पूजाला उपयोग कराच पंढ्र रंगाच समुद्रांत मिळाच साधन॑. हेज वर चक्र आकाराच ल्हान-ल्हान चिन्ह अस्ते.

चक्ळि n  a fried snack of flat concentric ring shape. एक तळलते पदार्थ ; चकली in sm. uis सार भाताबरोर चक्ल्या कि टेंगूळकी मिळींगून जेवलतर॑ तज रूच प्रमाद असत॑.

चखोट adj  good. fine. excellent. ओंगळाच विरुद्ध. चक्कोट. चोक्कोट. चोखट. चोखोट ; चोखट/चखोट in sm.  Note :- better चोखट. चोख in MM means "clean, pure, apt, good" etc.

चघळणे vi  to chew. दांतावाटि रगडून चावणे. uis खाले मागल॑ दोन दांत काढूनटाकला नंतर॑ मला बरोर चघळून खायाला होत नाही.

चटपट adv  hurriedly. लोक्कर-लोक्कर. जल्दि-जल्दि. uis बाहेर गामांत (विदेशांत) असणार लोक तेंच-तेंच (त्यंच-त्यंच) काम स्वता करून दंडक असणामुळ कोठतरीन  निघाम॑ म्हणजे चटपट निघून वेळाला जावून पावतील॑.

चट्णि n  chutney. तोळ्लायींगाच एक पदार्थ. तोंडलावण॑. uis अम्ही एकदपा तिरुनलवेलीला गेलस्तम्हा तिकडल॑ एक होटलांत॑ इड्ळीच बरोर चार विधाच चट्णि खाल्लों.

चड्डि n  underwear. आंत॑ नेसाच विजार. uis  म्हातारे झाला नंतर पॅन्ट/षर्ट घ्याच बरीस चड्डि/बनीयन घ्याला जास्ति पैसे वेचामते पडत॑.

चढणे vt  to climb. वेघणे.

चढणे fig  to get drunk. दारु पीवून नियंत्रण चुकणे. uis तो भरून पीऊनटाकून आलाहे वाटते. वेड वंकड बोलाच पाव्हून वाटते बेष चढलाहे म्हणून.

चढिवणे fig  to instigate. (दुसरेंच) मन्न॑ फिरिवणे ; चढवणे/चढविणे in sm. uis तो असलते काम करना म्हणून मला कळेल॑. कोणकी तला चढिवून देलसतील म्हणून वाटत॑.

चणा n  bengal gram. एक रीतीच दाळ. uis बज्जि कराला चणाच पीठ वापरतील॑. 

चतुरवैद्य n  a person who has mastered the four vedas. चतुर्वेदी. uis फार वर्षापुढे चेन्नैंत चतुरवेद नारायणाचार म्हणून एक थोर आचारे होते. त्यनी खर॑ म्हणून चार वेदीन वाचिंगट्लहोते.

चतुर॑ clever. smart. षाणपण॑.

चतुरंग n  chess. एक रीतीच खेळ॑. सतरंग. uis चतुरंगाच खेळ पहिले-पहिले भारतांतच आरंभ झाल॑ म्हणून सांगतात॑.

चतुर्थी n  fourth day of the each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीं चौथां दिवस/तिथी. चौत. चौती. चौथ. चौथी. uis भाद्रपद महिनांत शुक्लपक्षाच चतुर्थी दिवसी गणपतिपूजा येते.

चतुर्दशी n  fourteenth day of each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीं चौदावां दिवस/तिथी. uis प्रति महिनेंतीन दोन चतुर्दशी येईल॑.   

चतुर्भुज n Mahavishnu, the God with four hands. चार हाताच महाविष्णु.

चतुर्वेद n  the four vedas. चार वेद॑.

चदर n  bed sheet. bed cover. पांघरिवण॑. अंथरूणाच व॑र घालच/पांघरिवाच कापड. चादर. uis कोळ्हापूरांत मिळाच चदर घट्टि असत॑ अणी ते अंथ्रूणाच व॑र पांघरिवालीन, तसच अम्च॑ आंगाला पांघरिवालीन बरोर असत॑.

चपटा adj  flat. सपाट. uis उदंड (उजंड) दिवसास्क॑ मी दत्तन ठींगटल होतते पित्तळ लोहेंच एक विग्रहाच वर एक मोट्ठ॑ धोंडा पडून ते चपटा होऊन गेल॑.

चपटा adj  thin surfaced. पत्तळ॑. सपाट.

चपलि n  chappal. sandals. चालताना पांयेंत॑ घालाच साधन॑. uis आज पाष्टे दुकानबीदीला गेलसतम्हा मझ॑ चपलीच पट्टि तुटल॑. चोक्कोट काळ, डोळेच समोरच एक चमार बसलहोत-ते-करतां समेच (सवेच) ते बरोर कराला झाल॑.

चपात्ति n  chapati. गहूंच पीटांच पत्तळ रोटि. uis रात्रीच वेळी भात जेवाच सोडूनटाकून मी अत्ता अग्गीन चपात्तीच खोतों.

चप्रासि n  peon. ऑफीसांतल॑ उण॑ स्थितीच मनुष॑ ; चपराशी in sm. uis मझ॑ बॅन्कांत॑ चप्रासीच कामांत॑ मिळून रिटैर होताना जेनरल मॅनेजर झालते संभव मला कळेल॑.

चमचा n  spoon. ल्हान पळि. uis लोखुंडाच चमचा लोणचेंत॑ घाटलतर॑ लोणचे विटून जाईल म्हणून तज बद्दिल लांकडाच चमचा वापरणे आहे.

चमचा fig  a term used derisively for a sycophant. मस्का बडिवणार. uis "चमचा" म्हणून त्यांस॑ कां बलावतों म्हणून मला एक ल्हान पोर हे कारण देला. नेता सांगाच बरोर असूनदे, नाही, विरुद्ध असूनदे, दोनीं ओपाला तय्यार असणार लोके हेनि. म्हण्जे, बरोर वाचलतरीन "च-म-च", उलटा वाचलतरीं "च-म-च", हेच कारण॑ !

चमचागिरि n  sycophancy. मोट्ठ॑ लोकांस॑ संतोष करिवून स्वंत कार्य साध्य करणार. uis ऑफीसांत॑ चमचागिरि करून करून एवढ॑ पतोरि तो प्रोमोषन घेत होता. अत्ता एक नव॑ अधिकारि आलांपिरी तज हे काम चालना म्हणून वाटते.

चमार n  a cobbler. चंभार. चांभार. चपलि, बूट असले साधन॑ करणार. मोचि.

चमार n  one who belongs to the chamar cast. चंभार. चांभार. चमाराच जातीच मनुष॑.

चरखा n  a spinning wheel to spin cotton yarn. चर्खा. कापूसांतून दोरा कराच/काढाच यंत्र. uis स्वातंत्र्य समराच "स्वदेशी" आंदोलनाच समय महात्मा गांधि लोकांला चरखाच प्रयोग कराला प्रेरणा केले.

चरण n  foot. पांय.

चरणे vt  to graze cattle. चारणे. गाय, म्हैश॑, बक्रा असलत्येला गौत खायाला सोडणे.

चरस n  a type of addictive drug. नशाच एक वस्तू. uis उत्तर भारतांत कित्येल सन्यासी लोके चरस, भांग असलते नशाच पदार्थ वापरणे आहे तरीन दक्षिणांतल सन्यासींस॑ हे दंडक नाही.

चराचर adj  animate and inanimate creations. उत्पन्न झालते सर्वीन (जीव असाचीं जीव नसाचीं).

चरांट n  a thick rope. घट्टि दोरा. जाड दोरा. रस्सी. uis (1) आडांतून पाणी शेंदाला वाळीला बांधलते चरांटाच ओढा खजून खजून तुटाच स्थितीला आल-ते-करतां आज संध्याकाळीच पुढेच एक नव॑ चरांट घेयींगून येम म्हणून म्हणींगटलोंहें. (2) शिकिवून तय्यार करलते, म्हणजे अभ्यास झालत॑ हत्तीच सहायांत॑ राणाच हत्तीला धराला घट्टि चरांट उपयोग करतात॑.

चरित्र n  history. इतिहास. uis  तंजावूराच चरित्रांत॑ मराठांच राज सुमार 185 वर्ष होत॑. 

चरीवणे vt  shepherding. taking the cattle out for grazing. गाय, म्हैशीला चरणाला घेऊन जाणे. uis (1) मझ॑ बापा केम्हाईं सांगतील॑ "तू बरोर वाचनातर॑ गाय चरीवालाच लायक होशील॑". (2) खेड गावांत॑ गाय, बक्रा चरीवाच पाव्हूया. मझ॑ नातू अमेरिकांत्सून आलतम्हा तला गाय चराच पाव्हून सांगाला होयनाते एवढे आनंद झाले.

चर्खा n  a spinning wheel to spin cotton yarn. कापूसांतून दोरा कराच/काढाच यंत्र. चरखा. uis स्वातंत्र्य समराच "स्वदेशी" आंदोलनाच समय महात्मा गांधि लोकांला चर्खाच प्रयोग कराला प्रेरणा केले.

चर्चा n  discussion. debate. वाद. वादविवाद. uis ते दोघीं दीड घंटे कोण्तकी विषया व॑र चर्चा करत होते.

चर्म n  skin. काताड. uis चर्माच रोग आलतर॑ ते थोडक्यांत॑ बरोर होयना म्हणतील॑.

चलचित्र n  cinema. सिनिमा. चित्रपट. uis भूलोकांत भारताच पक्षा चलचित्र काढाच देश वेगळ॑ कोण्तीन नाही.

चलणे vi  to be mobile. जाणे. चालणे. निघणे. uis ते दादिगाच आंग अत्ता गरज नाही (गरद नाही). तेनी पुढास्क॑ घरांत चालून-फिरून आहेत.

चहाडि n  carrying tales. mischievous talk. छाडि. वंब (Tamil).

चहाडि-सांगणे vt  to indulge in mischievous talk. to carry tales. छाडि सांगणे. वंब बोलणे.uis  पोणावांटा आफीसांत लोक॑ दूसरांचवर चहाडि सांगून वांचणे सहज झालाहे.

चंचल adj  fickle minded. घट्टि/दृढ मन्न नसाच॑. uis ध्यान करणे/देवाच नामसंकीर्तन करणे, हे सर्वीन अम्च मन्न चंचल होयनास्क दृढ असाला साधक करेल॑.

चंडाळ n  name of a caste. एक वर्गाच नाव.

चंडाळ n  one belonging to the chandala caste. चंडाळ वर्गांत॑ उजलते मनुष. uis त्यंच सत्यनिष्ठा पालन करा करतां राजा हरिशचंद्राला एक चंडाळाच वेष घालामते पणीं पडले. 

चंडाळ घाण fig  horrid smell. भयंकर घाण. uis तीन दिवसाला अम्ही मैसूराला गेलोतों. परतून येऊन घर उघडताना नाहणींतून चंडाळ घाण बडिवत होत॑. एक उंदीर ते खोलींत मरून पड्लसाच पाह्यलों. 

चंदन॑ n  sandal wood. गंध. uis इन्दिरा गांधी अणी राजीव गांधी मेलतम्हा सरकार लाखों-लाख वेच करून चंदनाच लांकडांत (लांकूडावाटे) तेना (त्यांस) दहन केले.

चंदा n  money collected through contributions for any programme. कोण्त तरीन कार्यक्रमाला लोकांकडून जमा केलते (विचारून मिळिवलते) पैसा. uis गणेश चतुर्थीला पुढे-मागे कळनाते लोक चंदा घ्याला येऊन जातात. उदंड दन ते पैसेंत दारू पणीं पीतात म्हणून ऐकलोंहें.

चंद्र n  moon. भूमीच उपग्रह.

चंद्रकांत n  moonstone. एक रीतीच नगाच खडा.

चंद्रकोर n  crescent moon. अमावस्याच तीन चार दिवस पतोरीच चंद्र.

चंद्रग्रहण n  lunar eclipse. चंद्राचीं सूर्याचीं मध्य एकच पंक्तींत॑ भूमी येताना भूमीच सावली चंद्राच वर पडून चंद्र अद्रिश्य/दिसनास्क॑ होयाच. uis हिंदु संप्रदाय प्रकार चंद्राला राहु गिळताना चंद्रग्रहण होत॑ म्हणींगतों.

चंद्रबिंब n  moonbeam. चंद्राच किरण.

चंद्रमंडल n  the realm of the  Moon. चंद्राच स्थल. uis विज्ञानी लोकांस चंद्रमंडलाला जाऊन याला झाल तरीन, एवढ॑ पतोरी (पावतोरी) "कॅनसर रोग" कां येत म्हणून सांगाला होत नाही !

चंद्रमान n  calculations based on the movement of the Moon. चंद्राच भ्रमणाच आधारांत॑ कराच इषोब. चांद्रमान॑. uis चंद्रमान पंचांगांत॑ प्रति महिनेंत॑ चौदा चौदा दिवसाच दोन पक्ष अस्त॑.

चंद्रमौलि n  Lord Siva. भगवान शिव.

चंद्रशेखर n  Lord Siva. भगवान शिव.

चंद्रिका n  moon light. चंद्रप्रकाश.

चंद्रोदय n  moon-rise. चंद्राच उदय. uis कन्याकुमारींत॑ कित्येक दिवस चंद्रोदय अणी सूर्योदय हे दोनीं एकच वेळ पाव्हुया.

चंपक n  a type of flower/tree. चांपा. संपंगि (Tamil). uis बॅनगळूरांतल॑ बसवनगुडि, मल्लेस्वरम असलते जुन॑ ठिकाणि रात्रीचवेळी बीदींत लावलते चंपक झाडांत्सून याच चोक्कोट वास बॅनगळूराच एक प्रत्येकता आहे.

चंभार n  a cobbler. चांभार. चमार. चपलि, बूट असले साधन॑ करणार.

चंभार n  one who belongs to the chamar cast. चांभार. चमार. चमाराच जातीच मनुष.

चंभारीण॑ n  cobbler's wife. चांभारीण॑. चंभाराच बायको. 

चाकर n  servant (usually mentioned together 'नौकर-चाकर'). कामवाला. uis  "ऐ.ए.एस" झाल नंतर जन्म पूराहीं घरांत नौकर-चाकर असतील॑. त्यंच जीवन अगाऊच जागीरदारांबरीस उण॑ काहीं नाही.

चाकरी n drudgery. hardwork. कष्टाच काम. uis  अम्च अदृष्ट बर नाहीतर॑ कित्ति चाकरी केलतरीन वर जायाला होईना.

चाकु n  knife. सुरी. uis मोंड झालते चाकुनिशी कायतरीन कापाला प्रयत्न केलतर॑ हाताला लागून  घाव लागूया.

चाकोत n  a type of edible greens. एक रीतीच पालक. uis चाकोता पालाच नुस्त भाजी तजांतून केलते अंभटभाजी पक्षा बेष अस्त.

चाटणे vt  to lick. जिव्हाला लागिवणे. uis बोटावाटी तूप चाटून खाणे म्हणजे तला एक प्रत्येक स्वादच असत॑ !

चाणी n  a grinding wheel used for sharpening knives etc. चाकू (सुरी) बरोर कराच (तीक्ष्ण कराच) एक उपकरण॑. साणा. शाणी. uis चाणी घालून सुरी बरोर करणार मनुष अत्ताअग्गीन फार अप्रूप झालाहेत॑. Note. from Tamil.

चातुर्मास n  a period of four months from the ekadasi of the bright fortnight of Ashadh to the ekadasi of the bright fortnight  Kartika. आषाढ शुक्लपक्षाच एकादशींतूं कार्तिक शुक्लपक्षाच एकादशी पर्यंतल॑ चार महिने.

चान्न n  moon. चंद्र.

चाय n  tea. चाय. uis चाय पीणे पहिल॑-पहिल॑ चैनांत॑ झाल म्हणून सांगतात.

चादर n  a bed sheet. अंथरूणच वर अंथराच कापड. चदर. uis कोळ्हापूरांत मिळाच चादर घट्टि असत॑ अणी ते अंथ्रूणाच व॑र पांघरिवालीन, तसच अम्च॑ आंगाला पांघरिवालीन बरोर असत॑.

चार n  four. तीनाच नंतरल॑ संख्या.

चार n  a spy. शत्रूच रहस्य कळाला गूढ काम करणार.

चारणे vt  to graze cattle. चरणे. (गाय, म्हैश॑, बक्रा) गौत खाणे. uis  "सिटींत॑" गायीला/म्हैशीला चाराला ठिकाणच नाही. ते पाप कचडा-डब्बाच जवळ॑ ओठाकून पान, कुजलते भाजी, कागद हे पूराहीं वेंचून काहींतरीन मिळलका म्हणून पाह्त अस्ते.

चाल n  gait. चालाच रीत॑. uis प्रसिद्ध चित्रकार एम.एप्फ़. हुसैन "गज-गामिनी" म्हणून एक सिनिमा काढले. हे नाव हत्तीच चाल हेज आधारावर ठिवलते आहे.

चालणे vi  to walk. (पांयेंत) पुढे जाणे. uis समुद्राच कांठशीच वाळू वर चालणे पांयाला श्रम अस्त॑.

चालणे vi  to be in process. होत असणे. चालू असाच॑. uis हे काळांत॑ टीवींत॑ चालू असाच कोण्त धारावाहीईं पाह्याला योग्य नाहीत झालाहे.

चालिवणे vt  to conduct. to manage. काम करिवणे ; चालविणे/चलवणे in sm. uis भरून दपा एक नव स्थापना आरंभ करापक्षा ते पुढे बरोर चालिवणेच थोर काम अस्त॑.

चालू adj  that which is current, in force, in action, in operation etc. सध्याला होत असाच॑.

चालू slng  of easy morals or ethics. not tied down by rules of conduct. करार कंडिप नाहीते. uis सगळ॑ दाद्ग्याच बरोरीं मान-मर्यादा पाह्यनास्क॑ वागाच बायकोल "चालू" म्हणून सांगणे आहे.

चाळ n  a building with many apartments in a narrow lane. एक गल्लींतल॑ ल्हान-ल्हान घरांच वठारा/वाडा. uis थोर-थोर पटणांत॑ पैसेच सौकर्य उजंड उणे आहेते लोक चाळांत॑ राहाच पाव्हुया.

चाळीस n  forty. एकोण्चाळीसाच नंतरल॑ संख्या. uis चाळीस वर्षाच उणे वय असणार लोक "बै-फोकल" अर्सा घालींगाच फार अपरूप असतात॑.

चावडि n  Police station. पोलीस ठाणा.

चावणे vt  to bite. दांतांतूं चावणे. uis " वरडाच कुत्र चावना" अस॑ इंग्ळीषांत॑ एक म्हण आहे.

चावि n  key. किलसात. uis चावि हरपून गेल तर॑ तेच मादरीच अण्खीन एक चावि करींग्या पक्षा किलुप बदलिवणेच चोखोट.   

चावि देणे vt  to wind. चावि फिरिवून चालू करणे. uis मझ॑ घरांत एक "ग्रान्ड-फादर क्लोक" आहे. तला तीन वाराला एक दपा चावि देम॑.

चावी देणे id  to instigate. चढिवणे. uis पांडवांच विरुद्ध॑ तम्हा-तम्हा अन्याय कराला दुर्योधनाला चावी देणेच शकुनीच मुख्य काम.

चांगल॑ adj  good. nice. चांगळ॑. चोखोट. चोक्कोट. बर॑ ; चांगला in sm.

चांगलपण॑ n  goodness. चांगळपण॑. चांगुलपण॑. चोखोटपण॑. uis थोर मनाच लोकांच चांगलपण॑ दुरुपयोग करून पैसे मिळिवाला कितिकी दन असतात॑.

चांगुलपण॑ n  goodness. चांगलपण॑. चोखोटपण॑. 

चांदी n  silver. रुपे. uis सोनेचीन चांदीचीन दुकान मुंबईच ज़वेरी-बज़ारांत भरून आहे.

चांद्र adj  lunar. चंद्राला संबंध झालते.

चांद्रमान n  calculations based on the movement of the moon. चंद्राच प्रदक्षिणाच आधारांत॑ कराच इषोब. चंद्रमान॑. uis चांद्रमान पंचांगांत॑ तेतीस महिनेला अधिकमास येईल.

चांद्रमास n  lunar month. एक पौर्णमि अथवा एक अमावस्यांतूं नंतरच पौर्णमि अथवा अमावस्या पर्यंतल॑ एक महिना.

चांपा n  a mat made of reed grass . एक रीतीच बरीक बेतांत॑ केलत॑ चटई. uis उन्हाळाच दिवसी पलंगाच व॑र अंथरूणंत॑ निजाच पक्षा भोईवर चांपा अंथरींगून निजल तर॑ हायशी असेल॑. Note:- in DM  बेत means cane or rattan and in sm it is called वेत.

चांपा n  a type of flower/tree. चंपक. संपंगी (Tamil). 

चांभार n  cobbler. चंभार. काताडाच काम करणार.

चांभारीण॑ n  cobbler's wife. चंभारीण॑. चांभाराच बाईल.

चिकट adj  sticky. चिकट होणे. uis तेलाच भांडी बरोर घासना तर॑ ते शिवताना चिकट वाटेल॑.

चिकटणे vi  to stick to. चिकटून असणे. uis उन्हाळांत॑ बहेर गेल तर॑ घाम सुटून कापड आंगाला चिकटणे मला थोडक पणीं अवडनाच अवडना.

चिक्टिवणे vt  to stick. गोंद लावून चिकटणे ;  चिकटविणें/चिकटवणे in sm. uis राष्ट्रीय पार्टींच तंटा फार झालहे. कोठ कोठ ठाम मिळते की तिक्कड अग्गीन त्यंच नोटीस चिक्टिवून परिसर पूरा विकार करूनटाकतात॑. 

चिकार adj  plenty. उदंड॑. उजंड॑. भरून.

चिकित्सा n  medical treatment. ओखद देवून आंग बरोर करणे. uis अम्च॑ शेदारल॑ घरच॑ म्हातारे मनुषाला स्ट्रोक येऊन हॉसपिटलाला बलाईंगून गेले. दहा दिवस तिकड ऐ.सी.यूंत ठींगून नंतर॑ पाठिवसोडले. कराच अग्गीन करणे झाल॑, अण्की इथपर काय चिकित्सा देलतरीन वांचाला होईना म्हणून सांगूनटाकले. 

चिकित्सालय n  hospital. हॉस्पिटल.

चिक्कट n  sticky. चिकटून असण॑.

चिक्की n  a sweet made of jaggery, nuts, gram etc. एक गुळ्चीट पदार्थ ;  चिकी in sm. uis मुंबईच जवळच॑ लोणावालांत॑ चोक्कोट चिक्की मिळल॑. ते चिक्कीच नावच "लोणावाला चिक्की" म्हणतात॑.

चिक्कू n  sapota fruit. एक फळाच नाव.uis चिक्कूच पंडू अधीक खाल्ल तर॑ पोटसूळ येईल म्हणतील॑.

चिक्कोल n  slush. wet mud. चिखोल. मातीहीं पाणीहीं मिळून झालते मउ साधन॑ ;  चिखल in sm. uis दोन-तीन महिना पसून बांगळूरांत॑ कॉरपरेषन लोके तेवढ॑ बीदीं खांडून ठिवलाहेत॑. पाऊसाळांत॑ घरांतून बाह्येर उतराला होयनाते एवढ॑ चिक्कोल झालाहे.

चिक्कोलाच-फोड n  fungal infection of the toe joints. ओले अथवा चिक्कोला मुळे पांयेंच बोटाच मध्ये याच फोड ; चिखल्या in sm. uis पाणींत/मातींत अधीक काम करणारांस॑ चिक्कोलाच-फोड येणे सहजच.

चिखोल n  slush. wet mud. चिक्कोल. uis दोन-तीन महिना पसून बांगळूरांत॑ कॉरपरेषन लोके तेवढ॑ बीदीं खांडून ठिवलाहेत॑. पाऊसाळांत॑ घरांतून बाह्येर उतराला होयनाते एवढ॑ चिखोल झालाहे.

चिचुंदरी n  shrew. उंदीरास्क॑ एक ल्हान प्राणि. चुचुंद्री. चिचोंदरी. चिचोंद्री ; चिचुंद्री/चिंचुद्री  in sm. uis पाह्याला सुमार एक सार्खच असलतरीन उंदीरहीं चिचुंदरीहीं दोन वेगळ॑ वेगळ॑ वर्गाच प्राणी आहे.

चिचोंदरी n  shrew. उंदीरास्क॑ एक ल्हान प्राणि. चिचुंदरी. चुचुंद्री. चिचोंद्री ; चिचुंद्री/चिंचुद्री  in sm. uis चिचोंदरी एक रूक्ष प्राणी आहे. चार-चार घंटेला पोट भरिवल नाहीतर॑ भूकांत मरूनजाईल म्हणून वेगळ॑ ल्हान प्राणींला खायाच प्रयत्नांत तज श्रद्धा सदाहीं असत॑.

चिचोंद्री n  shrew. उंदीरास्क॑ एक ल्हान प्राणि. चिचुंदरी. चिचोंदरी. चुचुंद्री ; चिचुंद्री/चिंचुद्री  in sm. uis वेगळ॑ वाट नाही म्हणताना तजपक्षा मोठ जंतूला आक्रमण कराला चिचोंद्री श्रम करल॑.

चिटपांखरू n  a small bird. एक ल्हान पक्षी. 

चिटपांखरू n  butterfly. moth. चित्तपांखरू.

चिटपांखरू n  any small flying insect. चित्तपांखरू.

चिटपांखरू n  an expression denoting utter stillness or solitude. एकदम विजन स्थळाला (ओस स्थळाला) उद्देश करून सांगाच एक गोष्ट. Note :- from चिट (still, silently) and पांखरूं (a bird). uis देऊळाच सदस्य लोके मला त्यंच एक कार्यक्रमाला मुख्यअतिथी म्हणून बलावले. पण, मी जाऊन पाह्ताना तथ॑ चिटपांखरू पणीं होतनाही.       

चिट्टि n  small notings in a paper. कागदांत॑ लिव्हलते ल्हान विषय ; चिठ्ठी in sm. uis डोक्टर लिव्हून देलते ओखदाच चिट्टि हरपून गेलते मळे मला पुन्हा एक दपा डोक्टराकडे जामते पडले.

चिट्टि n  a list (of any thing). विषयांच चिट्टि. uis संपाकाला आवश्य आहेते सामग्री अग्गीन बाजू असाच दुकानांतूनच अम्ही घ्याच॑. महिना महिनेला चिट्टि लिव्हून पाठिवलतर॑ ते अग्गीन दुकानाच पोर घरांतच आणून घालूनटाकल॑.

चिट्टि  n  a type of small (monthly) savings normally practiced by housewives and encouraged by shop keepers to obtain interest free finance. दुकानवाले (साधारण॑ होऊन बायकेंला) महिना-महिना पैसे मिळिवून सामान घ्याला प्रोत्साह करिवाच एक पद्धती. Note. from Tamil. uis (1) मध्यम वर्गाच बायके जास्त म्हणून चिट्टि बांधतात, कारण 5/6 तेतीच नंतर॑ पैसे हातांत॑ उरेल का म्हणून त्यंच मनांत॑ भें अस्त॑. (2) कां म्हणून कळना, बायकांस॑ चिट्टींत॑ मिळणे म्हणजे फार उत्साह असत॑.

चिडक॑ adj  peevish. शिडक॑ ; चिडका in sm. uis तज चिडक॑ तोंड पाहतानच कळते तला कोण की अपमान केले म्हणून.

चिडकोर adj  peevish. irritable. hot-tempered. लोक्कुर राग येणार. शिडकोर. चिडखोर ; चिडखोर in sm.

चिडणे vi  to get irritated. राग येणे. शिडणे.

चिडिवणे vt  to irritate. राग आणिवणे. शिडिवणे ;  चिडविणें/चिडवणे in sm.

चिता n  funeral pyre. प्रेताला जळिवाच विस्तु.

चिताभस्म n  funeral ashes. चितांतूं काढलते भस्म. uis शव-संस्कार झाल नंतर॑ चिताभस्म समुद्रांतकी नदींतकी मिळिवणे आहे.

चिताभूमी n  cremation ghat. स्मशान. uis दिवसों-दिवस बंगळूर पट्णाच जनसंख्या वाढत आहे अणी त्यामळे नव॑ फ्ळाटांच संख्याहीं वाढत आहे. परिस्थिती एवढ॑ मोस॑ झालाहे म्हणजे, चिताभूमींत बांधलते फ्ळाट पणीं घ्याला लोके तय्यार आहेत॑. 

चित्तपांखरू n  butterfly. moth. any flying insect. चिटपांखरू.

चित्र  n  picture. पेट. पट. uis शंभर वर्षाच पुढे राजा रविवर्मा होढलते (ओढलते) चित्र अत्ता पणीं उजंड प्रचारांत॑ अहे म्हणताना त्यंच चित्रकला किती थोर होत म्हणून कळींगुया.

चित्रकला n  the art of drawing or painting. पट होढाच/ओढाच कला. uis वर्षा-वर्षी बंगळूरांत कुमार-कृपा बीदींत चालाच चित्रकला प्रदर्शन उदंड प्रसिद्ध झालाहे अणी त्यांत भाग काढाला पूरा देशांतून कलाकार/चित्रकार येतात॑.

चित्रकार n  painter of pictures. पेट (पट) होढणार/ओढणार.

चित्रगुप्त n  celestial account-keeper for Yama. पाप पुण्य हे विषयांच इषोब ठिवाच यमदेवाच एक अधिकारी. uis कायस्थ, माथूर असलते वर्गांत असणार लोके चित्रगुप्ताच वंशांत मिळ्लतेनी म्हणतात॑.

चित्रपट n  a cinema. सिनिमा.

चित्रवध n  massacre. decimation. अनेकांस॑ क्रूर होवून मरिवणे.uis महाभारत युद्ध झालांपिरी पांडवांच सैन्याला अश्वत्थामा रात्रीच वेळ त्यनी झोंपींत असताना चित्रवध केले.

चित्रवध fig  reduce to naught or gibberish. सत्यनाश. uis मझ लेंकीच वराडांत॑ "रिसप्षनाला" कोणाच की  शिपारीशांत॑ गाणेच कचेरी एर्पाड केलोतों. पण, कचेरी केलत्या ते कार्यक्रम चित्रवध करून मझ॑ मान काढूनटाकला. मला नवराच घरच लोकांला तोंड दाखिवाला होयनास्क॑ झाल॑.

चित्रा n  name of one of the 27 stars of Hindu astrology. हिंदु ज्योतिषांतल॑ 27 नक्षत्रांत॑ एक नक्षत्राच नाव. uis अम्च लोंकाच जातका प्रकार तज नक्षत्र चित्रा अणी राशी तुला आहे.

चित्रान्ना  n  a type of rice preparation. भातांत॑ केलते एक पदार्थ. फोड्णीच भात. Note. from Kannada. uis पास्टेच (पाष्टेच) पल्हाराला (फल्हाराला) चित्रान्ना म्हणून मझ॑ बाईल मला सांगतानाच मला वाटले, रात्रीच उरलते भातांत॑ ते केलसेल॑ म्हणून !

चित्राहुति n  food kept for devas on the right side of the leaf before partaking of food. जेवाच पुढे देवतांला म्हणून पानाच उजवकडे ठिवाच भाताच घांस. uis चित्राहुति करताना "चित्राय नम:, चित्र्गुप्ताय नम:, यमाय नम:, सर्व भूतोभ्यो नम:" अस॑ सांगून जेवाच पानाच उजव पटीस तीन-चार कणे भात ठिवणे आहे.

चिदानंद n  intellectual bliss. ज्ञानाच आनंद. ब्रह्मानंद.

चिन्मय adj  of pure intelligence. शुद्ध ज्ञान.

चिन्ह n  a sign. a mark. a symbol. खूण. अडयालम (Tamil). uis कपाळांतल॑ नामाच चिन्ह पाव्हून तमिल अय्यंगारां मध्ये तेनी तेनकिळैका वडकिळैका म्हणून सांगाला होईल.

चिपळ्या n  the two small wooden sticks or flats used for clapping  and accompanying  a musical discourse. हरिकथा कालक्षेप (कीर्तन) करताना वाजिवाच लांकडाच ल्हान वाद्य.
चिप्पा n  peel/rind of a fruit. फलाच सालपट. uis केळे सोलून चिप्पा बीदींत॑ घाट्ल तर लोक ते तुडिवून निसरून पडतील.

चिप्पि n  seashell. शिंप. uis अम्ही ल्हान अस्ताना अम्च घर समुद्राच जवळ होत॑. तम्हा नित्य संध्याकाळी समुद्राकडे जावून चिप्पि हुडुकून काढणे अम्च एक खेळ होत॑. Note. from Tamil.

चिमट n  pinch. दोन बोटाच मध्ये चेंपणे. चुमट ; चिमूट/चिमट in sm. uis ते पोर अन्याय खोडी करत होता म्हणून मी तला एक चिमट देलों.

चिमट n  a pinch (of anything). दोन बोटाच मध्ये चिमटून काढाच एवढ॑. नंखर॑. चिमटा. चुमटा. uis आज केलते भाजीला एक चिमट मीठ उणे आहे.

चिमटणे vt  to pinch. चुमटणे. दोन बोटाच मध्ये चेंपणे.

चिमटा n  a pinch (of anything). दोन बोटाच मध्ये चिमटून काढाच एवढ॑. नंखर॑. चिमट. चुमटा. uis आज केलते भाजीला एक चिमटा मीठ उणे आहे.

चिमटा n  pincers. tongs. चिमटी. हिडिक्कि (Kannada). uis विदेशाला जाताना अम्च लोक॑ मुख्य म्हणून घेऊन जायाच भांडींच बरोर चिमटा अवश्य असेल.

चिमटी n  pincers. tongs. चिमटा. हिडिक्कि (Kannada). 

चिमणा n  a cute little boy. चुमणा.

चिमणी n  sparrow. चुमणी. uis  अम्च घराच बाल्कनींत तुळसीच रोप आहे. तज शेदारीच एक मातीच परातांत अम्ही पाणी ठिवतों. दिसोडी पाष्टे (पाहटे) दोन चिमणी येऊन आंघोळी करून तुळसीच बीं तोडून उडून जात॑. ते दोघीं गेल जन्मांत ब्राह्मण असलासाम॑ !

चिरड॑ n  irritation. annoyance. मनाच तंटा. uis तो पुन्हा-पुन्हा सांगिट्ल तेच सांगत असतो. ऐकून मला चिरड॑ येते.

चिरड॑ n  derisive or disdainful attitude. उणीवता. एळक्करम (Tamil). uis अरुणोदि उठून दंडक झालते लोकांला उशीर होऊन उठाच लोकांना पाह्यिल तर चिरड॑ अस्ते.

चिरडी n  a piece of cloth (shorter than a sari) used by poor women to cover themselves. दरिद्र बायके नेसाच लुगडाच पक्षा ल्हान असाच एक कापड. uis  ग्रामांत काम मिळनास्क॑ तथेले दरिद्र लोक पट्ट्णाला येऊन रोडाच कोनेंत संसार करणे, अणी त्यंच बायका चिरडी नेसून असणे, लेंकरे नावगान॑ हिंडणे, हे सर्वीन पाह्याला फार कष्ट वाटते. देव म्हणणर एकला आहे का नाही का म्हणून संदेह पणीं येते.

चिरणे vi  & vt   to cut into pieces. to slice. कापून ल्हान-ल्हान फोडी करणे. uis आवक्काई लोणचे करताना गोट्टीनिशी चिरून घालणे आहे.

चिरमोरे n  a  snack made of  parched-rice, mixed with assorted fried and roasted munchies. चुरमोरे. भाजलते पोहेंत॑ विध-विध पदार्थ तळून घालून केलते मिक्स्चर (English). uis चिरमोरे खायाला बेष असलतरीन, जास्ती खाऊनटाकलतर॑ पोटाला तंटा होईल.

चिरलते बोटाला चुण्णा लावनाते मनुष provs  a miserly person. कंजूस मनुष.

चिरंजीवि n  immortal. अमर. uis हिंदु पुराणांत॑ सात चिरंजीवी आहेत.

चिरोटी n  a sweet poori like preparation of several layers made of chiroti rava. एक प्रत्येक र्रवांत॑ केलते पूरीस्क॑ असाच एक गुळ्चीट पदार्थ ; चिरोटी/चिरोटा/चिरोंटी in sm. uis चिरिटीच बरोर साखरेच पूड अणी बादाम-दूध मिळिवून खाणे आहे.

चिल्लर n  small coins. change. ल्हान मोलाच पैसाच नाणय॑. Note:- नाणय॑ in DM for coins and in sm it is नाणी.

चिल्लरखर्च n  stray expenses. इकडे-तिकडे कराच ल्हान खर्च. uis भाजीपालावालाकडून मिर्शिंगा, करेपाक नाहीतर॑ कोत्तमल्लि घ्यालाकी, नाहीतर, संपाकाला वेगळ॑ अवसरांत पह्जते कायतरीन घ्यालाकी म्हणून मझ बाईल संपाक घरांत॑ केम्हीन चिल्लरखर्चाला म्हणून थोड पैसे ठींगेल॑.

चिवडा n  a snack of a mixture of fried munchies. मिक्स्चर.

चिंच n  tamarind fruit used in cooking. संपाकाला उपयोग कराच एक रीतीच फळ॑. uis दक्षिण भारतांत॑ संपाकाला चिंच फार उपयोग करतील॑.

चिंच-मीठ adj  sour/tangy and salty. अंबटीं मीठाचीं रूच.

चिंचोणी n  tamarind seeds. चिंचोणे. चिंचाच बीं ; चिंचोका in sm. uis चिंचोणी भाजून खायाला बेष असल॑.

चिंचोणे n  tamarind seeds. चिंचोणी. चिंचाच बीं ; चिंचोका in sm.

चिंतना n  contemplation. thinking. विचार.

चिंता n  worry. anxiety. संकट योचना. uis लोंक बरोर वाचनास्क॑ अवघड पोरांच बरोर हिंडत आहे म्हणून मझ॑ मित्राला थोर चिंता झालाहे.

चिंता n  thinking. pondering. योचना करणे. uis तो कां अस॑ बोलला म्हणून कित्ती चिंता करून पाह्यल तरीन मला समजल नाही.

चिंतामणि n  wishing stone. म्हणींगाच वस्तू द्याच एक रत्न.

चिंधि n  a rag. tattered cloth or garment. फाटक॑ कापड. वातर॑. uis कुर्सी, पलंग, चौरंग असलते साधन पुसाला म्हणून केम्हाहीं (केम्हीं) दोन तीन चिंधि अम्च॑ घरांत असेल॑.

चीटी n  printed cotton cloth. छापलते कापूसाच कापड ; चीट in sm. uis हे काळांत थोर नगरांत॑ चीटीच "नैट-गौण" अणी चोळी हे अग्गीन कामवाले पणीं घालींगनाते. खेडे गांवांत॑ (गामांत॑) अत्ता पणीं चीटी घेणार आहेते. Note:- (1) used in the old days for frocks/blouses. (2) "chintz" in English, from चिंट of Gujarati.

चीनी n  sugar. साखरे. 

चीर n  a crack. a split. (बाहेरच भाग मात्र) लांब आकारांत॑ फुटून असणे. uis 'सिमेंट प्लास्टर' कराला उपयोग कराच वाळूंत॑ माती असल तर॑ थोड दिवसाच नंतर भिंतीत॑ चीर पडेल॑.

चुकणे vi  to err. to commit faults or errors. चूक होणे. uis ते ल्हान पोरी उदंड षाणी (शाणी) वाटते. एक वारांतच तिन॑ विष्णु-सहस्रनाम पूरा चुकनास्क सांगाला शिकींगटली. 

चुकणे vi  to stray or deviate. वाट चुकणे. uis घरच मांदराला किती दूर जावून सोडल तरीन, चुकनास्क॑ ते परतून घराला येऊन पावेल॑.

चुकणे vi  to miss (aim, target, destination etc). लागनास्क॑/पावनास्क॑ होणे. uis (1) अंबाच झाडांत॑ पिकलते तीन अंबा होते. मी तीन दपा भिरकावलते धोंडा तीन दपाईं चुकनास्क ते तीन अंबालीन लागले. (2) वाट चुकनास्क जायाला कळ्ळ तर॑ तू यांस अत्ताच बलाईंगून जा. 

चुकणे vi  to evade. to escape. सुटून पळणे. uis पोलीस ठाणांतून तो चोरटा चुकून पळून गेलते विषय अन्वेषण करतान कळ्ळ॑, पोलीस लोकेच तला सुटिवलते म्हणून.

चुकिवणे vt  to make some one commit a mistake. दूसरेकडून चूक करिवणे.

चुकिवणे vt  to set some one free/escape. सुटिवणे. uis जैलांत घाटलते नक्सलैट्सांला तिकडून चुकिवाला "ह्यूमन रैट्स" लोक कराच प्रयत्न पाह्यलतर॑ मला फार बेजार वाटते. Note:-  (1) in sm सुटणे (vi) means 'to get loose from bonds' , 'to go off (like a bomb)'. In DM सुटिवणे (vt) means 'setting free'. (2) चुकवणे/चुकविणे in sm means 'to evade' , 'to avoid', 'to shun'.

चुकूनपिकून adv  by blundering inadvertence. inadvertently. not by design. by chance. चुकूनमाकून. अप्पून-तप्पून (Tamil).

चुकूनमाकून adv  by blundering inadvertence. inadvertently. not by design. by chance. चुकूनपिकून. अप्पून-तप्पून (Tamil) ; चुकूनमाकून/चुकूनवाकून in sm.  uis मला कळून तो वाचणेंत॑ शाणा (षाणा) काहीं नहो. कस की चुकूनमाकून परीक्षा जिंतला.

चुक्कुनूरु  adj  broken-up and scattered. छिन्नाभिन्न॑. चूर-चूर होऊन इकडे-तिकडे होणे. Note. from Tamil. uis ते ल्हान पोर विपरीत चेष्टा करतो. कोण्त बावोली हातांत॑ मिळ्ल तरीन ते चुक्कुनूर करना तर॑ तला मनस्समाधान येइना.

चुचुंद्री n  shrew. उंदीरास्क॑ एक ल्हान प्राणि. चिचुंदरी. चिचोंदरी. चिचोंद्री ; चिंचुंद्री in sm. uis पाह्याला सुमार एक सार्खच असलतरीन उंदीरहीं चुचुंद्रीहीं दोन वेगळ॑ वेगळ॑ वर्गाच प्राणी आहे.

चुट्टा n  a type of rolled-up country cigar. गुंडाळून केलते देशी सिगरेट. Note :- The word "चुट्टा" appears to be a shortened form of the Tamil word "shuruttu" (शुरुत्तु) or the Malayalam word चुरुट्टु, meaning "a roll (of tobacco)". The etymology of the English word "cheroot" is शुरुत्तु / चुरुट्टु. uis अम्च॑ घरच॑ गृहप्रवेशाच कार्यक्रम होत अस्ताना चौदा वर्षाच मझ॑ चुलत भाऊ माडीवर जाऊन सिगरट फुंकत होता. ते पाव्हून मझ॑ आजा वरडले, "चुट्टा पिट्टा पीलतर॑ तुज सालपट सोळूनटाकन" म्हणून !

चुणा n  lime paste. चुण्णा uis विडाच पान खाताना चुणा जास्ति लावल तर॑ जिव्ह॑ जळेल॑.

चुण्णा n  lime paste. चुणा. uis जुने काळांत घर बांधाला सिमेन्टाच बद्दिल चुण्णा वापरत होते.

चुपचाप adv  silently. गपचुप. uis बाजू घरच॑ मनुष कायकी विषय काढींगून अम्चकडे भांडाला आला. नंतर॑ चूक तजच म्हणून कळ्ळांपिरी चुपचाप डोस्के लवींगून उतरून गेला.

चुमट n  a pinch. बोटा वाटी चेंपणे. चिमट ; चिमूट/चिमट in sm.

चुमटणे vt  to pinch. चिमटणे. दोन बोटाच मध्ये चेंपणे. uis तो मला खेळांत॑ चुमटलते अत्ता पणीं दुखत आहे.

चुमण॑ adj  small. ल्हान ; चुमणा in sm. uis चुमण॑ वयेंतूनच "मॅंडलिन" श्रीनिवास त्यंच अद्भुत सामर्थ्य भूलोकाला दाखिवले अणी "जीनियस" म्हणून प्रशस्ति घेट्ले. 

चुमणा adj  small (boy). ल्हान पोर. uis चुमणा पोर म्हणून तुला यंदा सोडतों. केलते खोडीला दोन रपाटा होढल असाम॑.

चुमणी adj  small (girl). ल्हान पोरी. चिम्मी. चिमणी. uis चुमणी पोरी म्हणून असतानच तिन॑ मूकप्राणींच व॑र अपार स्नेह दाखिवत होती.

चुमणी n  sparrow. एक ल्हान पक्षी. चिमणी. uis  झाड उण॑ झाला मळे की "बिल्डिंगस"/बांधणी अधीक झाला मळे की पट्णांत (सिटींत) चुमणींच संख्या उदंड उण॑ झालाहे.

चुरचुरणे vi  to tingle. मुंग्या येणे. uis पाष्टे झोंपींतून उठताना उजव॑ हाताच कोंपुर पलंगांत लागून चुरचुराला आरंभ झालते, एक घंटे पर्यंतीन सुटल नाही. अत्ता कायकी थोड उणे झालाहे. 

चुरमुरा n  a  snack of parched rice mixed with assorted fried and roasted munchies. चिरमोरे. चुरमोरे. मुरमुरा. uis बाह्येरच गामाला निघताना अम्च॑ आजी चुरमुरा काढींगून ययाला विसरनाच विसरना.

चुरमोरे n  a  snack of parched rice mixed with assorted fried and roasted munchies. चिरमोरे. चुरमुरा. मुरमुरा. uis देशस्थ लोकांच घरांत कराच चुरमोरेस्क॑ वेगळे कोठीन मिळना.

चुरी n  knife. सुरी. चाकू. कत्ती (tamil) ;  सुरी in sm. uis प्लेनांत तीन इंचाच चुरी पणीं घेऊन जायाला अनुमती देत नाहीत॑/सोडत नाहीत॑.

चुलत adj  relatives from the paternal side. बापाचकडेल॑ सोयरीक लोके. uis चुलत सोयरांच पटीस कोणाच तरीन निधन झाल तर॑ अम्हाला दहा दिवसाच सूतक करामते पडेल॑.

चुलतआजा n  father's father's brother. बापाच बापाच भाऊ.

चुलतबहीण n  paternal uncle's daughter. काकाच लेंक. uis मझ॑ बापा त्यंच (तेंच) घरांत तेवढ॑ दना बरीस वडील असणामळे मझ॑ एक चुलतबहीण मझ॑ बरीस चाळीस वर्ष धकटी आहे !

चुलतभाऊ n  paternal uncle's son. काकाच लोंक. uis मझ॑ एक चुलत भाऊ अत्ताच॑ इन्जनीरिंगात मिळालाहे. तो मझ॑ बरीस बावन (52) वर्ष चुमणा आहे.

चुळा n  a large earthen fire place. एक मोट्ठ॑ विस्तूच चूल ; चुला in sm. uis वीट कराच चुळा एकदपा पेटिवलतर॑ उदंड दिवस ते जळत असल॑.

चुंडेकाय  n  name of an edible seed used in preparations of sambhar and vattal. एक ल्हान झुडूपाच बीं. हे सांभार, वत्तल (संडिगे) असल॑ पदार्थांत॑ उपयोग होते. सुंडेकाय. Note. from Tamil. uis गोड्डुपिट्ळेंत॑ मणतक्काळी नाही तर॑ चुंडेकाय (सुंडेकाय) तळून घालणे आहे.

चूक n  a wrong thing. a mistake. चूक. uis केलते चूकाला प्रायश्चित्त कराच पक्षा, ते बरोर करणेच चोखोट.

चूक n  error. चूक. uis इषोबाच परीक्षांत॑ मझ॑ नातु एक चूक केलत्यामळ॑ शंभराला शंभर मिळ्ळ॑ नाही.

चूक n  blunder. चूक. uis 1962 च भारत-चीन युद्धांत॑ अम्च॑ देशाला थोर पराजय झाल॑. अम्च॑ प्रधानमंत्री जवहरलाल नेहरू चीनाला आवश्याच पक्षा अधीक विसंबून अम्च॑ सेनाला बरोरल॑ तय्यारींत॑ ठींगनाते चूकामळे अम्हाला हे पराजय सोसांवत॑(सोसामते) पडले. 

चूक n  fault. चूक. uis नवरीच थोरळा भाऊच मूर्खपणा मळे हे वराड राहून गेल॑. पूरा चूकीं तजेच.

चूक adj  mistaken. incorrect. uis तंजाऊर मराठी पुणे मराठीच एक अशुद्ध रूप आहे अस॑ एक चूक अभिप्राय लोकांस आहे.

चूक सांगणे vt  to find fault. आरोप करणे. uis हे वराड राहून गेलत्याला अम्ही अग्गीन जवाबदारी आहों. अत्ता कोणालीं चूक सांगून प्रयोजन नाही.

चूडामणि n  crest jewel. किरीटांतल॑ रत्न.

चूप adj  sharp. कूर्प. Note : चूप is from Kannada and कूर्प is from Telugu. uis अम्च॑ घरच सुरी तेवढीन मोंड झालाहे. साणावाला आलतर॑ ते अग्गीन तला देऊन चूप करिवाम॑.

चूर n  a fragment. a bit. तुकडा. uis मला तिरुपती लाडूच एक ल्हान चूर देल तर॑ पुरे, कां म्हणजे मला डयबीटीस आहे.

चूरचूर n  pieces. shattered bits. मोडून चुक्कुनूर झालते. uis बरोरल॑ श्रद्धा दाखिवस्नास्क॑ अर्सा हाती काढताना चुकून खाले पडून चूरचूर झाल॑. 

चूर्ण n  ayurvedic medicines in powder form. पूड केलते आयुर्वेद ओखद. uis साधारण होवून आयुर्वेदाच ओखद चूर्ण, लेह्य अणी कषाय अस तीन रूपांत॑ असत॑.

चूल॑ n  fireplace for cooking. stove. oven. स्टोव (English). संपाकाच विस्तु पेटीवाच स्थल. uis जुन॑ काळांत॑ लांकडाच चूल पेटिवणे म्हणजे एक थोर तपत्रयाच काम होते. भिजलते लांकड म्हणजे अण्खीन कष्ट.

चूळ n  mouthful (of water). (पाणींत॑) भरलते तोंड. uis विक्कल (गोचका) आल॑ तर॑ एक चूळ पाणी सात भाग करून गिळल तर॑ शांत होईल.

चूळ भरणे vt  to fill one's mouth with water for rinsing. तोंड भरून पाणी काढून तोंड शुद्ध करणे.

चेतना n vitality. जीवशक्ती.

चेला n  disciple. शिष्य. चेळा.

चेला n  side-kick. उण॑ स्थितीच सहायक॑. चेळा. uis  कपट सन्यासी नित्यानंदाच अवघड काम पोलीसाला दाखिवून देलते तजेच एक चेला म्हणून सांगतात॑.

चेष्टा n  mischief. prank. विनोदाच खोडी. चेष्टपण॑. uis मझ॑ लोंक चार-पांच वर्षाच वये असताना उजंड चेष्टा करत होता. पण अत्ता थोर्ळा झाल॑ व॑र चेष्टपण अग्गीन सोडून उदंड (उजंड) मर्यादान आहे.

चेष्टपण॑ n  mischievousness. विनोदाच खोडी. uis येतां येतां तज चेष्टपण॑ जास्ती होत आहे. लाड जास्ती होऊनगेल की कायकी.

चेंचणे vt  to pound or crush roughly. चेंचरणे. ठेंचणे. uis वरुवंटांत चेंचून कराच हिर्व (हिरव॑) चिंचाच तोक्काच तोळ्लावणे (तोंडलावणे) खायाला बेष असेल॑.

चेंचणे vt  to crush and cause to bruise. चेंचरणे. चेंपून घाव करणे. चेंदरणे.

चेंचरणे vt   to squeeze. to compress. चेंचणे.

चेंडु॑  n  bouquet of flowers. काठीनीशी मिळिवून बांधलते विध-विधाच फूल॑. Note. from Tamil.

चेंदरणे vt  to crush and cause to bruise. चेंपून घाव करणे. चेंचणे. uis भिंतींत आणि बडिवताना जागृतान कराम॑. नाही तर॑ चुकून बोट चेंदरून जाईल॑.

चेंपणे vt   to squeeze. to compress. चेंचणे. ;  चेपणें in sm. uis आवश्य नाहीस्क॑ पिकलते फोडाला चेंपून पू काढ नको म्हणून सांगूनीं तो ऐकला नाही. अत्ता ते एक थोर व्रण (र्रण) झालाहे.

चैत्र n  first month of the Hindu year. पंचांगांतल॑ पहिलच महिना.

चोक्कोट adj  good. fine. excellent. ओंगळाच विरुद्ध. चक्कोट. चखोट. चोखोट. चोखट ; चोखट/चखोट in sm. Note :- better चोखट. चोख in MM means "clean, pure, apt, good" etc. uis दुसरेंस अम्ही चोक्कोट केलतर॑ एक दिवस तज चोक्कोट परिणाम येऊनच सरल॑.

चोक्कोट तेल n  gingili oil. sesame oil. तीळाच तेल. चक्कोट तेल. चखोट तेल. चोखोट तेल. चोखट तेल. uis देवाच॑ दिवा चक्कोट तेलांत॑च लावाम म्हणाच पद्धताच आधार काय म्हणून कळत नाही. ते सवंग होत म्हणाकरतांकी कायकी. Note. better चोखट तेल. This word appears to be a direct transliteration from the Tamil word नल्लेण्णै, meaning "good-oil". The Tamil word itself appears to be morphed from एळ्ळेण्णै, "एळ्ळु" in Tamil meaning "sesame". 

चोक्कोट सरप n  cobra snake. नागसरप. नागराजा. Note :- better चोखट सरप. this is a direct transliteration from the Tamil नल्ल-पांबु, meaning "good snake". 

चोखट adj  good. fine. excellent. ओंगळाच विरुद्ध. चोक्कोट. चक्कोट. चखोट. चोखोट ; चोखट/चखोट in sm.  Note :- चोख in MM means "clean, pure, apt, good" etc.

चोखोट adj  good. fine. excellent. ओंगळाच विरुद्ध. चोखट. चखोट. चोक्कोट. चक्कोट ; चोखट/चखोट in sm.  Note :- better चोखट. चोख in MM means "clean, pure, apt, good" etc.

चोचो n  name of a vegetable. चौचौ. एक भाजीपालाच नाव. uis (1) मेक्सिको राज्यांतून वेगळ॑ देशाला प्रचार झालते हे भाजीपालाला ते राज्यांत "चयोटे" म्हणतात. भारतांत हेला चौचौ म्हणून पणीं सांगतात. (2) चौचौच खर नाव चोचो म्हणून भरूनदनास कळना.

चोपाळा n  an indoor swing with a large flat wooden plank, hung by four chains. चोंपाळा. जोपाळा. झोपाळा. घरच आंत॑ चार सांखळींतून लोंबून घालाच लांब रुंदाच लांकडाच पालणा/ झूला. uis चोपाळा जोरान॑ लोटल तर॑ ल्हान लेंकरांस॑ तजांत॑ बसाला भें वाटेल॑. Note :-  चोपाळा has its origin in चौ=चार and पांय. In olden times चोपाळा had four wooden legs and when removed off the chains it could be kept on the ground for other purposes.

चोरटा n  thief. चोर्टा. चोर्टपण॑ करणार. uis (1) मझ॑ बापा चोरटा आलास्क सोप्पन/स्वप्न पडून अर्ध रात्री झोंपींत वरडतील॑. (2) पोलीसवाले ल्हान चोर्टेंना धराला तैयार असतात पण थोर-थोर चोर्टेंच जव्वळ जायाला भींगतात. कारण त्येंचकडे पदवींत असणार लोक॑ त्येंच परिचयाच असतात॑.

चोरणे vt  to steal. दूसरेंच वस्तू त्यास॑ कळनास्क॑ काढणे. uis चोरणे, लटक सांगणे असलत्या पक्षा नीच कार्य वेगळ॑ काहीनच नाही.

चोरी n  theft. चोर्टपण॑. uis भारत देशांत रिकाम असणारांच संख्या वाढल॑ त्या मळ॑ चोरी अणी डकायटी जास्त होत आहे.

चोर्टपण॑ n  thievery. चोरी. uis  'एल.पी.जी’ ग्यासाच व॑र निर्बंध असणा मळे ग्यास डिस्ट्रिब्यूटर चोर्टपणान सिलिंडर जास्त मोलाला विकतात॑.

चोर्टपण॑ n  thieving metality. चोरी कराच स्वभाव. uis तला कित्ति तरीन उपदेश देऊन पणीं चोर्टपणाच बुद्द अण्खीन सोडला नाही म्हणून ऐकून मला उजंड संकट झाले.

चोर्टपण॑ n  deceit. एमारिवाच स्वभाव. uis  रेजिस्ट्रार आफींसांत काम करणार गुमास्ता/कारकून तेथल॑ आधार-पत्र (डाकूमेन्ट) बदलीवून चोर्टपणान॑ एकलेंच भूमि दूसरेंना विकतात॑.

चोर्टा n  thief. चोरटा. चोर्टपण॑ करणार.

चोर्टा पडाच वेळ fig  very early in the morning when all are deep in slumber. पाष्टे-पाष्टे अग्गिदनीं गाढ झोंपांत असाच वेळ. 

चोर्टाला विंचू चावलतेस्क provs  like the condition of a guilty person who, despite extreme provocation to himself, dare not retort lest his guilt is found out. चूक केलते मनुष तज चूक वेगळ॑ कोणाच गवनांतीं येईनास्क असाकरतां तोंड उघडाला होयनाते अवस्थांत सांपडींगाच स्थिती. 

चोवीस adj  twenty-four. तेवीसाच नंतरल॑ संख्या. uis भारत देशांत इतपर कोण्त ठामहीं चोवीस घंटे ’करंट’ असाला संभव नाही. कारण, करंटाच उतपत्ती अवश्या बरीस 40% उण॑ आहे.

चोळणे vt  to rub with hand. हाता वाटे रगडणे/घासणे. uis मला दोन दिवसा पसून उजव डोळे कंड होत होते. रत्री झोंपींत॑ मला कळनास्कच ते चोळून चोळून अत्ता तंबड झालाहे.

चोळि n  blouse. बायका थान झांकून नेसाच वस्त्र. uis हे काळाच फॅषनाच (अलंकाराच) चोळि शिवाला शंपीलोक (दर्जीलोक) उण॑ पक्षा एक हदार रुपे काढतात म्हणून ऐकून मला विश्वास होत नाही.

चोळून-मारणे met  to harass. to squeeze the hell out someone. फार उपद्रव देणे. uis साधारण म्हणून वरला काम जास्त घेटल तर "चोळून मारतो" म्हणून सांगणे आहे. पण, वेगळ॑ विधांत पाह्यल॑ तर॑ ते अम्च चोखोटालाच म्हणींगाम॑. कारण, तजमळे नव-नव काम शिकाला अवकाश मिळते.

चोंपाळा n  an indoor swing with a large flat wooden plank, hung by four chains. चोपाळा. जोपाळा. झोपाळा. घरच आंत॑ चार सांखळींतून लोंबून घालाच लांब रुंदाच लांकडाच पालणा/ झूला. uis अम्ही जोर होऊन चोंपाळांत खेळत असताना मझ॑ धक्टी बहीण॑ समोर आली अणी चोंपाळाच पाट तिज गाळाला बडिवून मोठ्ठ घाव लागून रक्त गळाला आरंभ झाल॑.
Note :-  चोपाळा has its origin in चौ=चार and पांय. In olden times चोपाळा had four wooden legs and when removed off the chains it could be kept on the ground for other purposes.


चोंबु n  a small vessel for carrying or pouring water etc. तांबे. पाणी भरून टिवालकी ओतून घालालकी वापराच एक ल्हान पात्र ; चंबु in sm. uis जुने काळांत नाहणींत आंघोळी कराला तांबेच चोंबु वापरत होते, पण अत्त हे काळांत प्ळास्टिकाच मग वापरात॑.

चौक n  a square. चौक. चार पटीसीन एकच लाब(रुंद) असाच आकार.

चौक n  a thin cloth towel. आंग पुसींगाच एक पत्तळ कापड॑. uis प्रयाण करताना जाड "टर्की-टोवल" काढींगून जायाच पक्षा पत्तळ चौक काढींगून जणे सौकर्य असेल॑.

चौकंडी n  a village square used as a meeting place. खेडेगांवाच चतुराकाराच बसून बोलाच ठिकाण. 

चौकी n  a police station. पोलीस ठाणा. uis बंगळूरांत मध्य मध्य रौडी लोकांस पोलीस चौकीला होढींगून (ओढींगून) जाऊन किलुपांत घालणे आहे.

चौकीदार n  watchman. रक्षण करणार. uis हे मध्ये ए.टी.एमाच चौकीदारांस मारून पीटून त्यांतल॑ पैसे चोराच अक्रम जास्ती झालाहे म्हणून प्रति ए.टी. एमालीन चौकीदार असाम॑ म्हणून पोलीस सगळ॑ बॅंक अधिकारींसीन निर्देश देलाहेत॑.

चौघे pron  four persons. चार दन॑. चौघे दन॑. uis ए.टी.एमाला चौकीदार ठिवलतर॑ काय प्रयोजन॑ ? चौघ दन॑ येऊन तला ध्वंस केलतर॑ काय कराला होईल॑ ? 

चौचौ n  name of a vegetable. एक भाजीपालाच नाव. चोचो. uis  मेक्सिको राज्यांतून वेगळ देशाला प्रचार झालते चौचौच खर नाव चोचो म्हणून भरूनदनास कळना. ते राज्यांत हेला "चयोटे" म्हणतात.

चौ-चौ adv  mixed haphazardly. गजबिज. घंदरा-घोळा. uis घरच सामान पूरा घंदरा-घोळा होऊन पडल॑होत॑ म्हणून पाष्टे (पाहटे) ऑफीसाला जायाच पुढ॑ मझ॑ लोंकाला ते पूरा बरोर काढून ठीव म्हणून सांगूनटाकून गेलों. सायंकाळी येवून पाह्ताना ते पूरा तसेच चौ-चौ म्हणूनच होते.

चौत n  fourth day of the each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीं चौथां दिवस/तिथी. चौती. चौथ. चौथी. चतुर्थी.

चौती n  fourth day of the each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीं चौथां दिवस/तिथी. चौत. चौथ. चौथी. चतुर्थी.

चौथ n  fourth day of the each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीं चौथां दिवस/तिथी. चौत. चौती. चौथी. चतुर्थी.

चौथी n  fourth day of the each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीं चौथां दिवस/तिथी. चौत. चौती. चौथ. चतुर्थी.   

चौदा adj  fourteen. तेराच नंतरल॑ संख्या.

चौरंग n  a square stool. चौक आकाराच स्टूळ.






छ the seventh consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच सातवां व्यंजन॑.

छक्का  n  a playing card with a value of six. सहाच संख्याच खेळाच पान.

छक्का  n  a dice with six on it. खेळाच डैसांतल॑ (English) सहाच चिन्ह. uis लूडो खेळताना दोन छक्का घाट्लतर॑ अण्कीन एक दपा डैस लोळिवाला अधिकार मिळल॑.

छक्का  n  a hit for a six in cricket. क्रिकेट खेळांत॑ सहा रण्णाच एक मार. uis भाराताच॑ कॅपटन महेन्द्र सिंग धोनी गेल वर्ष पतोरी भरून छ्क्के मारत होता. पण अत्ता तज कॅप्टनसी छ्क्काला जायाच स्तिथींत आहे !

छत n  ceiling. घराच छप्पर॑. uis अधीक दिवस/महीने एक खोलि झांकून ठिवल तर॑ छताच खाले गरवसा बांधून असाच साध्य आहे.

छत n  awning. canopy. छप्पर॑.

छत्र n  a large hall for conducting marriages etc. वराड, मुंज असलते कार्यक्रम कराला उपयोग कराच एक मोट्ठ॑ बांधणि. uis चेन्नैंत वराडाच छत्र पह्जे म्हणजे सहा-नौ महिने पुढेच बुक/निश्च्य करामते पडते अणी दिवसाला तीन-चार लाख रुप्पे तज भाडे अस्ते.

छत्रपति n  emperor. साम्राट. uis छत्रपति शिवाजी महाराज नहोते मण्जे मुघल राजेलोक मध्य अणी दक्षिण भारत पूराहींन कब्ज़ा केलसतील॑.

छत्रि n  umbrella. कोडे (tamil). uis  उन्हाळा असून दे, पाऊसाळा असून दे, केरळांतल॑ लोक॑ बाहेर जायाच वेळ छत्रि अवश्य घेऊन जातील॑.

छप्पर n  thatched  canopy. पंदल. छत. uis छप्पर बांधताना बरोर वाटम देनास्क॑ बांधल तर॑, पाऊसाच पाणी लोक्कुर गळून जायनास्क खोलीच आंत उतरेल॑.

छप्पर n  roof. घर अथवा बांधणीच व॑र असाच बांधोटी. कूरै (tamil). uis हे काळांत॑ पोणावांटा घराला कॉण्क्रीटाच छप्पर घालतात तरीन, समुद्राच कांठशीच प्रदेशांतीं जास्ति पाऊसाच प्रदेशांतीं अत्ता पणीं ओडाच छप्पर घालतात॑.

छप्परपलंग n  a canopied cot. a four-poster cot. छप्पर/डांचपर्दा बांधाला सौकर्य असाच पलंग. 

छाडि n  mischievous talk. वंबु॑ (tamil)  ; चहाडी in sm.

छाडि-सांगणे vt  to indulge in mischievous talk. to carry tales. वंब॑-बोलणे ; चहाडी-सांगण॑ in sm. uis एक-एक आफीसांतीं दहा टक्के (10 %) लोक॑ त्येंच काम काहींन करनास्क नुस्त छाडि सांगून वांचणार असतील॑.

छाती n chest. bosom. breast. थान. स्तन.

छाप n  impression. stamp. मुद्रा. uis कित्येक लोकांना अधीक वाचणे नाहीं तरीन त्यंच हस्ताक्षर छापलास्क अस्ते !

छापणे vt  to print. मुद्रण करणे. uis मझ॑ लोंक ल्हान असताना नित्य एक वस्तु घ्याला नच्च करेल॑. तला मी सांगेन॑ "इतपर अम्ही पैसे छापल तरच वांचाला होईल॑".

छापणे vt  to stamp. मुद्रा घालणे. uis डाक घरांत अवसरान छापाच वेळी कित्येक तपाल-स्टॅम्पाच व॑र मुद्रा पडना. तसल॑ तपाल-स्टॅम्प ओल॑ करून काढून पुन्हा उपयोग कराला होईल.

छापा n  stamping. मुद्रा घालाच. uis सर्व दुकानांतीं असाच झोकीच यंत्रीं / ’तरासीं’ सरकाराच नियमाजोक्त॑ प्रति वर्षीन ’इनस्पेक्शन’ करिवून छापा करीवाम॑.

छाया n  image. छायारूप॑.

छाया n  reflection. प्रतिबिंब. पडसावळि. uis केरळ राज्यांत॑ आरनमुळा गामांत॑ लोहेंतून एक प्रत्येक रीतीच अरसा करतात॑. हेजांत॑ दिसाच छाया, गाजाच अर्सांत दिसाच छायास्क अस्ते.

छायाचित्र n  photograph. फोटो.

छांदस n  very specific on likes and dislikes. अवडणे न अवडणे हे विषयांत॑ दृढ मन्न असणे. Note. from Telugu, Tamil. uis म्हातारे लोकाना खाणे-जेवणाच छांदस जास्ति अस्ते. प्रति वेळीं प्रत्येक-प्रत्येक पदार्थ करांव॑(कराम॑), नीट तूप-तेल घालून तळलते भाजी असांव॑(असाम॑), दुपारच "टिफ़्फ़िनांत" गुळ्चीट ठिवाम॑, अस॑ विचारचाला अंतेच असना.

छि interj  an expression of denial in a manner of putting down. अवडनाते कायतरीन विषीं तुच्छ कळिवाच गोष्ट. uis तेनी मला विचारले "तू केम्हातरीं एकदा दारू पीशील न्हो का" ? ; मी म्हटलों "छि!  मी सुद्ध म्हणून दारू शिवत नाही, तुला अस विचाराला धैर्य कस आल॑ ?".

छिन्नाभिन्न॑ adj  broken-up and scattered. चुक्कुनूरु. चूर-चूर होऊन एकडे-तिकडे होणे ; विच्छिन्न in sm. uis मिरासदार आजोबा मेला नंतर त्यंच कुटुंब छिन्नाभिन्न॑ होऊन गेल॑. वडील लोंक बाहेर देशांत राहून गेला, दूसराला वाचणे नाही अणि पूर्त पैसे उडीवला, दोघ लेंकीनीं विधवा झाले. अस॑ त्यंच कुटुंब छिन्नाभिन्न॑ झाल॑.

छीछी interj  an expression indicating vehement denial. जोरांत॑ निषेध करतां (ओपनास्क असतां) सांगाच एक गोष्ट. uis "छीछी, तो असल॑ मनुष न्हो. तो तज बायलीला कद्दीन दगा करून दूसरे बायकांच बरोर वागे ठींगना".

छेद n  a gap. a break. a crack. a separation. छेद.

No comments: